'अनोखं शिवप्रेम'; मोडी लिपीच्या शब्दातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची ४० फूट रांगोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:57 PM2021-02-19T17:57:14+5:302021-02-19T17:59:28+5:30
शिवप्रेमींकडून जाज्वल्य शिव पराक्रमाला उजाळा
पुणे (चंदननगर) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरवर्षी सर्वत्र धुमधडाक्यात साजरी केली जाते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाकडून शिवजयंती साजरा करण्यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीदेखील नियमांचे पालन करून अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबवत शिवप्रेमींकडून जाज्वल्य शिव पराक्रमाला उजाळा दिला जात आहे.
शिवरायांची जयंती साजरी करणे हा केवळ एखादा उत्सव साजरा करणे नसून हा शिवरायांकडून प्रेरणा घेण्याचा, शिवरायांच्या शिकवणीची पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून देण्याचा तसेच शिवरायांनी जनहितार्थ आणि कल्याणार्थ अवलंबलेल्या मार्गांवरून आपण मार्गक्रमण करत आहोत की नाही हे तपासण्याचा एक दिवस आहे.
'सुरेंद्र पठारे युवा मंच' आणि राजाधिराज प्रतिष्ठान यांच्यावतीने चंदननगरमधीलछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर शुक्रवारी ( दि. १९) अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यात मोडी लिपीतील मजकुरापासून शिवरायांची भव्य ४० फुटी रांगोळी श्रुती पठारे यांनी साकारली. तसेच या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, शाहीर गंगाधर रासगे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती युवा धावपटू अवंतिका नराळे, महाराष्ट्राची लावण्यवती फेम नृत्यांगणा पुजा शेडे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता युवा खेळाडू सिद्धेश चौधरी आणि मोडी लिपीची अभ्यासक श्रुती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवराय मोडी लिपी या शब्दात ४० फूट रांगोळी काढण्यात आली आहे.कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्र पठारे व स्वप्निल पठारे यांच्या वतीने करण्यात आले.