अनोखी श्रद्धांजली : मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दशक्रियेत केले हेल्मेटचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 01:01 PM2019-06-14T13:01:03+5:302019-06-14T13:02:16+5:30

गाडी चालविताना दिग्विजयच्या डोक्यात हेल्मेट असते, तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता...

Unique tribute: given helmets after child's accidental death | अनोखी श्रद्धांजली : मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दशक्रियेत केले हेल्मेटचे वाटप

अनोखी श्रद्धांजली : मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दशक्रियेत केले हेल्मेटचे वाटप

Next
ठळक मुद्दे: चाकण लायन्स क्लबचा पुढाकार

आंबेठाण : बापाच्या खांद्यावर तरुण तुर्क मुलाची तिरडी यापेक्षा मोठे दु:ख जगात कुठले नसेल. मात्र ज्या बापाच्या वाटेला हे दु:ख आले तसे दु:ख इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून मेदनकरवाडीतील किरण मेदनकर यांनी मुलाच्या दशक्रिया विधीला हेल्मेटचे वाटप केले. मेदनकरवाडी (ता. खेड) येथील बावीस वर्षीय महाविद्यालयीन युवकाच्या अपघातीमृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी चाकण लायन्स क्लबच्या माध्यमातून संबंधित युवकाच्या दशक्रियेनिमित्त उपस्थित नागरिकांना मोफत हेल्मेटचे वाटप करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. या भागात हा अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिग्विजय किरण मेदनकर ( वय २२ वर्षे ) असे अपघातातमृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दिग्विजय हा पुणे येथे बी. ई. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. गेल्या आठवड्यात त्याचा दुचाकीवरून पडून गंभीर जखमी होवून मृत्यू झाला होता. गाडी चालविताना दिग्विजय याच्या डोक्यात हेल्मेट असते, तर नक्कीच त्याचा जीव वाचला असता. त्यामुळे अशी वेळ अन्य कोणावरही येवू नये, यासाठी मेदनकर यांनी चाकण लायन्स क्लबच्या माध्यमातून नागरिकांना हेल्मेटचे वाटप केले. 
चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष मधुकर सातव, सचिव बाळासाहेब मुटके, चाकण पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन गोरे, नगरसेवक धीरज मुटके आदींच्या हस्ते या हेल्मेटचे वाटप करण्यात आले. 
यावेळी मेदनकरवाडीचे माजी सरपंच शांताराम मेदनकर, माजी उपसरपंच नंदराम भुजबळ, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पांडुरंग गोरे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा प्रमुख ह.भ.प. मुक्ताजी नाणेकर, डॉ. रमेश जाधव, सतीश प-हाड, शंकरराव डोंगरे, डॉ. विलास मांजरे, लक्ष्मण नाणेकर, किरण मेदनकर, गणेश लांडे, प्रकाश मांजरे, प्रकाश मुटके, दिलीप परदेशी आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
---------------
दिग्विजय हा आमचा जीव की प्राण होता. त्याच्या अपघाती मृत्यूने आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकी चालविताना त्याच्या डोक्यात हेल्मेट असते, तर हा प्रसंग त्याच्यावर ओढवला नसता. ही वेळ अन्य कोणावरही येऊ नये, यासाठी आम्ही हेल्मेट वाटप केले आहे. - किरण मेदनकर,  मृत तरुणाचे वडील 
 

Web Title: Unique tribute: given helmets after child's accidental death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.