दृष्टिहीनांचा अनोखा विवाह सोहळा

By admin | Published: May 3, 2017 02:38 AM2017-05-03T02:38:27+5:302017-05-03T02:38:27+5:30

सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी... देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने

Unique wedding ceremony for visually impaired | दृष्टिहीनांचा अनोखा विवाह सोहळा

दृष्टिहीनांचा अनोखा विवाह सोहळा

Next

पुणे : सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी... देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत... आपल्या मित्र-मैत्रिणींच्या लग्नसोहळ्याला जमलेले वधू-वरांचे दृष्टिहीन बांधव, अशा हृद्य वातावरणात दृष्टिहीन वधू-वरांनी आपला विवाहसोहळा अंतर्दृष्टीने अनुभविला.
निमित्त होते शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेने लावलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दोन अंध मुला-मुलींच्या अनोख्या विवाह सोहळ्याचे. या वेळी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. मुळशीतील रिहे गावचा चिंधू उर्फ नवनाथ गाडे या दृष्टिहीन तरुणाचा विवाह वर्ध्यातील हिंगणघाट येथील निर्मला हुकरे या मुलीशी झाला. नवनाथ हा अकरावीपासून लुई ब्रेल अपंग संस्थेत असून, सध्या बँक आॅफ महाराष्ट्र शिवाजीनगर शाखेत उत्तम पगाराची नोकरी करीत आहे. तर निर्मलाची बहीण अंध असल्याने त्या ओळखीतून तिचा आणि नवनाथचा विवाह जुळून आला. निर्मला ही गृहिणी असून, नवनाथला आपल्या डोळ्यांनी जग पाहण्यास साथ देणार असल्याचे तिने सांगितले. दुसरे दाम्पत्य हे सोमनाथ गायकवाड आणि सुमित्रा बोंद्रे. त्यांचे एकमेकांवर बऱ्याच वर्षांपासून प्रेम होते. दोघेही लुई ब्रेल अंध-अपंग संस्थेत असल्याने एकमेकांशी जवळचा संबंध होता. सोमनाथ हा औरंगाबाद सिल्लोड येथील असून सुमित्रा हीदेखील त्याच गावातील आहे. सोमनाथ लुई ब्रेल संस्थेच्या आॅर्केस्ट्रामध्ये उत्तम ढोलकी आणि ढोलक वाजवितो. तर सुमित्राने बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले असून एम.ए.ची तयारी सुरू आहे.

गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. न्यू सुयोग म्युझिकल बँड आणि दरबार, पुणे हे वरातीमध्ये सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा उत्साहात पार पडला. डोळ्याने दिसत नसूनही उपस्थितांचे प्रेम आणि आपुलकीने केलेली विचारपूस पाहून दोन्ही दाम्पत्यांच्या डोळ्याच्या कडाही आनंदाश्रूंनी पाणावल्या.

Web Title: Unique wedding ceremony for visually impaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.