दुभंगलेल्या महाराष्ट्राची दिल्ली संमेलनात दिसली एकी!
By श्रीकिशन काळे | Updated: March 2, 2025 10:28 IST2025-03-02T10:28:08+5:302025-03-02T10:28:50+5:30
या संमेलनाचे संयोजन ‘सरहद’ संस्थेने केले. त्या संस्थेचे प्रमुख नहार यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

दुभंगलेल्या महाराष्ट्राची दिल्ली संमेलनात दिसली एकी!
विशेष मुलाखत: संजय नहार, संयोजक, ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
श्रीकिशन काळे, वरिष्ठ प्रतिनिधी, पुणे
सध्या महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुभंगलेला आहे. माणूस जोडण्यासाठी, माणसा-माणसांमधील ‘सरहदी’ पार करण्यासाठी साहित्य, कला, संगीत याच गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून दिल्लीमध्ये संमेलन घेण्याचे ठरवले. खरंतर, दिल्लीत मराठी संमेलन कोणी घेऊच शकत नाही, असा विरोधी सूर आम्हाला ऐकायला मिळाला; पण या सर्वांवर मात करून आम्ही दिल्लीमध्ये मराठी बाणा दाखविला आणि संमेलन यशस्वी केले,” अशा भावना ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक आणि संमेलनाचे संयोजक संजय नहार यांनी व्यक्त केल्या.
नवी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले. या संमेलनाचे संयोजन ‘सरहद’ संस्थेने केले. त्या संस्थेचे प्रमुख नहार यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
दिल्लीत मराठी साहित्य संमेलन घेण्यामागील भूमिका आणि प्रेरणा काय होती?
दिल्लीमध्ये ७१ वर्षांमध्ये संमेलन झाले नव्हते. दिल्लीचे व्यासपीठ खूप मोठे आहे. त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर होत असतात. आपण भाषा, अस्मितेबद्दल बोलतो, त्यासाठी दिल्लीत संमेलन होणे महत्त्वाचे होते. आम्ही ‘सरहद’तर्फे माणूस जोडण्यासाठी जे-जे काही करत आहोत, त्यासाठी संमेलन एक मार्ग होता. आम्ही दहशतग्रस्त, हिंसाचारग्रस्त भागात काम करतो. ते करत असताना लक्षात आले की, साहित्य, संगीत, कला या माध्यमांचा उपयोग करून ही चळवळ मोठी करता येईल. त्याची प्रेरणा कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या गीतापासून मिळाली; तसेच दिल्लीत मराठी लोक एकत्र येत नाहीत आणि ते जाती-धर्म-पंथामध्ये विभागलेले आहेत, असे दृश्य आहे. सध्या महाराष्ट्र दुभंगलेला आहे. दुभंगलेला महाराष्ट्र एक आहे, हे सांगण्यासाठी दिल्लीतील संमेलन महत्त्वाचे होते.
घुमान संमेलनाचा अनुभव दिल्लीत कामी आला?
हो, दिल्लीतील संमेलनाचा फायदा झाला; पण घुमानला सर्व भार इतरांनी पाहिला होता. दिल्लीत संपूर्ण भार माझ्यावरच होता. त्यासाठी अगोदरच नियोजन केले होते. घुमान हे धार्मिक शहर होते, तर दिल्ली हे राजकीय शहर आहे. १९५४ मध्ये संमेलनाला पंतप्रधान आले होते आणि आताही आले. तर्कतीर्थ शास्त्री यांच्या शिष्या यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. हा सर्व योगायोग जुळून आणता आला.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षाची निवड कशी केली?
आमच्यासमोर शरद पवार, नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे या तीन व्यक्ती स्वागताध्यक्षासाठी होत्या. सुरुवातीला पवारांना विचारले तेव्हा ते नाही म्हणाले. नंतर गडकरी यांच्याकडे गेलो, तेदेखील नाही म्हणाले. मग शेवटी शरद पवार यांच्याकडेच आम्ही गेलो आणि त्यांनी होकार दिला.
दिल्लीत पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार व इतर राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी कशी जमवली?
संमेलन म्हटले की, राजाश्रय आलाच. त्याला वगळून पुढे जाता येत नाही. दिल्लीत संमेलन घ्यायचे तर मग राजकीय व्यक्ती सोडता इतर कोण स्वागताध्यक्ष झाले असते? कोणी उद्घाटन केले असते? हा प्रश्न होताच. म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांची निवड केली. त्यांचे दिल्लीतील वजन खूप आहे. त्यांनीच पंतप्रधान व इतर राजकीय नेत्यांची मांदियाळी जमवून आणली. ते श्रेय शरद पवार यांचेच आहे.
दिल्लीतील किती मराठीजनांना निमंत्रणे दिली?
संमेलनासाठी तरुण पिढी एकत्र केली आणि दिल्लीतील मराठी संस्था एकत्र केल्या. दिल्लीमधील मराठी लोकांचे एकही घर सोडले नाही, सर्वांना निमंत्रणे दिली. दिल्लीमधील ५० हजार मराठी लोकांचे पत्ते आम्हाला मिळाले. त्या सर्वांना निमंत्रणे गेली. त्यातील १५ हजार लोक येऊन गेले.
संमेलन म्हटले की, वाद आला आणि यावेळीदेखील राजकीय वाद झाला, त्याविषयी सांगा?
होय, या व्यासपीठावर दोन टोकाचे विचार असलेले लोक जोडलेले होते. यापूर्वी कितीतरी वेळा वेगळ्या विचारधारा असणारे लोक व्यासपीठावर आले आहेत. टोकाच्या विचारधारांनी या व्यासपीठावर एकत्र येणे हा इतिहास आहे. वाद हा संमेलनाचा अविभाज्य भाग आहे. महादेव गोविंद रानडे म्हणाले होते की, जो विरोधी विचार आहे, तोदेखील या व्यासपीठावर मांडला पाहिजे. त्यामुळे त्याला डावलता येत नाही. आता संमेलनात राजकीय वाद झाला; पण कोणी काय बोलावे? हे आम्ही सांगू शकत नाही किंवा कोणाचे तोंड दाबू शकत नाही.
संमेलनाचे फलित काय?
दिल्लीचे मराठी माणसाला आकर्षण आहे. महाराष्ट्राला दिल्लीबद्दल आकर्षण आणि भीती आहे; तसेच दिल्लीला महाराष्ट्राबद्दल आकर्षण आणि भीतीदेखील आहे. हे लव्ह-हेट रिलेशनशिप आहे. हे ब्रेक होण्यासाठी हे साहित्य संमेलन महत्त्वाचे ठरले. मराठी माणसाला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाण्याचा मार्ग याने मोकळा झाला. सर्व राजकीय टोकाची भूमिका असणारे नेते या व्यासपीठावर एकत्र आले. जे शक्य नव्हते. ते संमेलनाचे फलित आहे.