पाण्याच्या टाक्यांसाठी एकमत

By admin | Published: August 31, 2016 01:42 AM2016-08-31T01:42:00+5:302016-08-31T01:42:00+5:30

शहराला २४ तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या ८२ टाक्या उभारण्यासाठी २४५ कोटी रूपयांचे काम एल अ‍ॅन्ड टी या कंपनीला देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंगळवारी एकमताने मंजुरी दिली.

Unity of water tanks | पाण्याच्या टाक्यांसाठी एकमत

पाण्याच्या टाक्यांसाठी एकमत

Next

पुणे : शहराला २४ तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या ८२ टाक्या उभारण्यासाठी २४५ कोटी रूपयांचे काम एल अ‍ॅन्ड टी या कंपनीला देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंगळवारी एकमताने मंजुरी दिली. टाक्या बांधण्याच्या ८२ पैकी ७३ ठिकाणच्या जागा पालिकेच्या ताब्यात आल्या असून येत्या अडीच वर्षात सर्व टाक्या बांधण्याचे काम पूर्ण होईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराला स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत येत्या ५ वर्षात २४ तास पाणी पुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाकडेवाडी, पाषाणलेक, बालेवाडी, बाणेर वेस्ट, रामनगर, बाणेरगाव, भोसले नगर, बोपोडी, डुक्करखिंड, चांदणीचौक, पंचवटी, मॉडर्न कॉलेज येथे दोन टाक्या, फर्ग्युसन महाविद्यालय, चांदणीचौक बीपीटी, एसएनडीटी, गोखलेनगर, आयडियल कॉलनी, पर्वती, तळजाई, अहिरे गांव यांसह ८२ ठिकाणी या पाण्याच्या टाक्या बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
शहराला एकसमान २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी २ हजार ८१८ कोटी रूपये खर्च प्रस्तावित आहे. त्यासाठी शहरात एकूण १०३ पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार असून त्यापैकी ८२ टाक्यांच्या
कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
या कामासाठी एल अ‍ॅन्ड टी कंपनीचे ३.९४ टक्क्यांनी जास्त रकमेचे टेंडर आले होते. मात्र इतर तीन निविदांपेक्षा ते कमी असल्याने त्यांना या टाक्यांची उभारणी करण्याचे काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्यावर स्थायीने मान्यतेची मोहोर उठविली. या निर्णयामुळे शहराच्या विविध भागाला अपुरा पाणीपुरवठा होण्याच्या जाणवत असलेल्या अडचणी या टाक्यांच्या उभारणीनंतर कमी होतील.
सर्वांना एकसमान व पुरेसा पाणीपुरवठा करणे प्रशासनाला शक्य होईल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)

कोणतीही चर्चा न करता मंजुरी
प्रशासनाने पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी यापुर्वी काढलेल्या ८ निविदा का रद्द केल्या यासह कोणत्याही प्रश्नाची चर्चा न करता २४५ कोटी रूपयांच्या या मोठ्या प्रकल्पाबाबत स्थायी समितीच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
प्रशासनाकडून ८२ टाक्या उभारण्याच्या कामासाठी प्रत्येकी १० टाक्या याप्रमाणे ८ स्वतंत्र टेंडर यापुर्वी काढण्यात आले होते. त्यासाठी विविध कंपन्या व ठेकेदारांकडून ४० निविदा महापालिका प्रशासनाकडे दाखल केल्या होत्या. परंतु ही निविदा प्रक्रियाच अचानक रद्द करून सर्व ८२ टाक्या बांधण्याची एकच निविदा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र ही निविदा प्रक्रिया मध्येच का रद्द केली याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही.

Web Title: Unity of water tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.