विद्यापीठ प्रशासन विद्यार्थिकेंद्रित व्हावे - प्रसेनजित फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:29 AM2017-12-02T02:29:16+5:302017-12-02T02:29:31+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधर प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने ती चर्चेची ठरली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधर प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने ती चर्चेची ठरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू प्रसेनजित फडणवीस हे नोंदणीकृत पदवीधरच्या खुल्या गटातून विजयी झाले. या पार्श्वभूमीवर, त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
प्रसेनजित फडणवीस म्हणाले, मी अनेक वर्षे विद्यार्थी चळवळीत काम केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी माझा जवळून संबंध आलेला आहे. अधिसभा सदस्य म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर माझा भर राहणार आहे.
विद्यापीठ हे धोरणकेंद्रित न बनता विद्यार्थीकेंद्रित बनले पाहिजे. आज विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या समस्या अधिसभेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
दरवर्षी विद्यापीठातून पदवी घेऊन लाखो पदवीधर बाहेर पडतात. पदवीखेरीज त्यांच्या हातात इतर कोणतेही कौशल्य नसल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांना विविध कौशल्य अभ्यासक्रम शिकवले जाणे, ते शिकत असतानाच विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. कंपन्यांनाही प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज असते. त्यासाठी विद्यापीठाकडून पुढाकार घेऊन समन्वयाची भूमिका बजवावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
मी ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर काम करतो. सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबरच त्याद्वारे फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी या विषयाबाबत जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी मोफत वाय-फायच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, मात्र त्या सुरक्षित आहेत का, याची तपासणी करणे आवश्यक ठरते. ‘‘फुकट मिळते ते सगळेच पौष्टिक नसते’’ यानुसार त्याची खात्री करून घेतली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
मी यापूर्वी रात्र प्रशालेच्या संस्थेवर सचिव म्हणून काम केले आहे. नोकरी करीत शिक्षण घेणारा मोठा वर्ग समाजात आहे. नोकरी करताकरता शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:चे भवितव्य घडविल्याची अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नोकरी करत विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी बहि:स्थ अभ्यासक्रम चालविला जातो. या बहि:स्थ अभ्याक्रमांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा विचार आहे. त्याला माझ्याकडून १०० टक्के प्राधान्य दिले जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंदाजपत्रक मोठे आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. विद्यापीठाला विविध प्रकल्पांसाठी मिळणाºया सर्व निधीचा पुरेपुरे वापर व्हावा, याकडे लक्ष दिले जाणार आहे. हा निधी वेळच्या वेळी खर्च झाल्यास तो परत जाणार नाही.
विद्यापीठाशी संबंधित आणखी अनेक विषय आहे, त्याची माहिती करून घेऊन त्यावर काम करायला आम्हाला आवडेल. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर आणखी नवनवीन गोष्टींची माहिती होत जाईल. अधिसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांचे नातेवाईक रिंगणात उतरले होते. मात्र निवडून आलेल्यांनी आपापल्या संस्थांचे हित जपण्यासाठी अधिसभेच्या सदस्यपदाचा गैरवापर न करता विद्यार्थी हितासाठी तो जास्तीत जास्त केला जावा. मी यापूर्वी अनेक वर्षे विद्यार्थी चळवळीत काम केले, त्या माध्यमातून अधिसभेवर निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे. निवडणूक संपली आहे. अधिसभेला राजकीय आखाडा बनविला जाऊ नये. अधिसभेचा सदस्य म्हणून काम करीत असताना सर्वांनी विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवूनच कार्यरत राहावे, अशी अपेक्षा आहे.