विद्यापीठ पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:59+5:302021-07-11T04:09:59+5:30
पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १२ जुलै ते ३१ जुलै ...
पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १२ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करता येणार आहेत. पीएचडी प्रवेश पूर्वपरीक्षा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी लॉग-इन केल्यानंतर विद्यार्थी २ तास परीक्षा देऊ शकतील.
नेट, सेट, गेट, सीएसआयआर, आयसीएआर, डीबीटी आणि डीएसटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी सवलत देण्यात आली आहे. परीक्षेत संशोधन पद्धती व विद्यार्थ्यांच्या विशेष विषयावरील प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातील. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर प्रवेश पूर्वपरीक्षेतून सवलत मिळालेल्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ८०० रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
सुमारे दोन वर्षांपासून अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. पीएचडीसाठी मार्गदर्शक मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश मिळू शकला नाही. मात्र विद्यापीठाने पीएचडी मार्गदर्शक आन????? साठी नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीमुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील अधिकाधिक प्राध्यापकांना पीएचडी ‘गाईड’ म्हणून मान्यता मिळणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील संशोधन प्रक्रियेला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.