विद्यापीठातील भुयारी मार्ग होणार ‘टुरिस्ट पॉइंट’

By Admin | Published: August 19, 2016 06:19 AM2016-08-19T06:19:57+5:302016-08-19T06:19:57+5:30

पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीखाली ४०० फूट लांबीचा भुयारी मार्ग असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे; मात्र इमारतीमधून

University campus will be organized in 'Tourist Point' | विद्यापीठातील भुयारी मार्ग होणार ‘टुरिस्ट पॉइंट’

विद्यापीठातील भुयारी मार्ग होणार ‘टुरिस्ट पॉइंट’

googlenewsNext

पुणे : पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीखाली ४०० फूट लांबीचा भुयारी मार्ग असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे; मात्र इमारतीमधून बाहेर जाणारा हा भुयारी मार्ग लवकरच ‘टुरिस्ट पॉइंट’ म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे इंग्रजांनी उभारलेल्या पुरातन वास्तुकलेचा महत्त्वपूर्ण ठेवा पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील राजभवनाजवळ नुकताच भुयारी मार्गाचा शोध लागला. पुण्यातही इंग्रजांनी ‘गव्हर्नर हाऊस’ म्हणून भव्य दगडी इमारत उभी केली. ही इमारत म्हणजे, सध्याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भव्य इमारत. ब्रिटिशकाळात उभारण्यात आलेल्या अनेक इमारतींच्या खाली भुयारी मार्ग असल्याचे दिसून येते. मुंबईतील भुयारी मार्गाएवढा मोठा नसला, तरी विद्यापीठातील मार्ग वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे काम सुरू असल्यामुळे तो बंद ठेवण्यात आला आहे. त्यात सध्या इलेक्ट्रॉनिकचे; तसेच प्रयोगशाळेतील जुने साहित्य ठेवण्यात आले आहे; मात्र इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच हा मार्ग ‘टुरिस्ट पॉइंट’ म्हणून विकसित केला जाणार आहे.
विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील म्हणाले की, तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर बार्टल फ्रेरे यांच्या कार्यकाळात १८६२-६४ मध्ये इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र १८६४ ते १८७१ या कालावधीत इमारतीचे काम पूर्ण झाले.
फ्रेरे यांना या इमारतीत वास्तव्य करण्यास मिळाले नाही; मात्र इतर गव्हर्नर १८७१ ते १९४७ या काळात वास्तव्यास होते. (प्रतिनिधी)

भुयारी मार्गाचा वापर
जेवण घेऊन जाण्यासाठी
विद्यापीठाच्या इमारतीपासून सध्याच्या पोतदार संकुलापर्यंत हा भुयारी मार्ग आहे. पोतदार संकुलाजवळ ब्रिटिशकालीन स्वयंपाक गृह (भटारखाना) होते. भटारखान्यात बनविलेले जेवण ट्रॉलीतून मुख्य इमारतीमध्ये नेले जात. या मार्गात हवा व प्रकाश येण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली आहे. सध्याचे मुख्य इमारतीमधील शिवाजी सभागृह म्हणजे ब्रिटिश गव्हर्नर यांचा डायनिंग हॉल होता. तो १६ बाय ३० फुटांचा आहे. भुयारी मार्गातून इमारतीजवळ आल्यानंतर दोन लहान खोल्या दिसतात. या खोल्यांचे दरवाजे खूप भक्कम आहेत. त्यामुळे या खोल्यांचा वापर शस्त्र ठेवण्यासाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आर. व्ही. पाटील यांनी सांगितले.

जेन्स ट्रबशॉ इमारतीचा आर्किटेक्चर होता. इमारत बांधणीसाठी त्या काळात १ लाख ७५ हजार पाऊंड रुपये खर्च येणार होता.
सध्या ही किंमत ४०० कोटींहून अधिक आहे. त्यामुळे ब्रिटनच्या राणीच्या दरबारातही यावर चर्चा झाली होती. सर विन्स्टंट चर्चिल हे काही दिवस या इमारतीमध्ये वास्तव्यास होते.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे काम सुरू असल्याने हा भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. पूर्वी तो वापरण्यायोग्य नव्हता; परंतु भुयारी मार्गात दिवे लावण्यात आले असून, फरशी बसविण्यात आली आहे. सध्या त्यात निरुपयोगी साहित्य ठेवण्यात आले आहे; मात्र इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर, हा मार्ग टुरिस्ट पॉइंट म्हणून विकसित केला जाईल. -डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रिटिश गव्हर्नर पावसाळ्यामध्ये पुण्यात वास्तव्यास येत. सुसज्ज व भव्य इमारत उभारण्यात आली होती. त्यात सर्व सोईसुविधा या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. गव्हर्नर हाऊस बांधण्यासाठी निवडण्यात आलेल्या ५१२ एकर जागेच्या बरोबर मध्यभागी विद्यापीठाची इमारत आहे. इमारत १०० फूट उंच असून, टॉवरच्या बरोबर खाली भुयारी मार्ग आहे.
- आर. व्ही. पाटील
कार्यकारी अभियंता

Web Title: University campus will be organized in 'Tourist Point'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.