विद्यापीठ परीक्षेचा सराव ५ एप्रिलपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:59+5:302021-03-31T04:11:59+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हजार रुपये घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षा बारा दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हजार रुपये घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षा बारा दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. विद्यापीठाकडे आत्तापर्यंत सुमारे ४ हजार प्रश्नसंच जमा झाले आहे. बहुतांश विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना ४ ते ५ एप्रिलपासूनच ऑनलाइन परीक्षेचा सराव करता यावा यादृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तब्बल पाच हजार तीनशे विषयांचे प्रश्नसंच प्राध्यापकांकडून तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत विद्यापीठाकडे ४ हजार प्रश्नसंच जमा झाले असून उर्वरित प्रश्नसंच पुढील तीन ते चार दिवसात जमा होतील, अशी शक्यता परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना प्राध्यापकांनी प्रश्नसंच जमा न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सराव करता यावा, यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी. ए., एम.ए., बी. कॉम., एम. कॉम. वगळता बहुतांश सर्व विषयांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. लवकरच उर्वरित सर्व अभ्यासक्रमाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, असे परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
--
विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्यु. टेक. फाउंडेशन या कंपनीद्वारे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या परीक्षेमागे कंपनीला ७.५ रुपये देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या कंपनीला दिलेल्या रकमेपेक्षा ही रक्कम सुमारे अर्धी आहे.