विद्यापीठाची परीक्षा आता ११ एप्रिलपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:12+5:302021-03-10T04:12:12+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे १५ मार्चपासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा १५ दिवस पुढे ढकलल्या आहे. आता येत्या ११ ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे १५ मार्चपासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा १५ दिवस पुढे ढकलल्या आहे. आता येत्या ११ एप्रिलपासून एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीच्या सहकार्याने या परीक्षा घेतल्या जातील. तसेच परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक २३ मार्च रोजी प्रसिद्ध केले जाईल, असा निर्णय मंगळवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या (बीओई) बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे परीक्षा केव्हा होणार? याबाबत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या गोंधळावर अखेर पडदा पडला आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्चपासून होणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्ध केले होते. मात्र, परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निश्चित न झाल्याने परीक्षा एप्रिल महिन्यापर्यंत पुढे ढकलाव्या लागणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. तसेच विद्यापीठ स्वत:च्या कंपनीच्या सहकार्यातून परीक्षा घेण्याबाबत चाचपणी करत करून मंगळवारी परीक्षेच्या गोंधळावर पडदा पडणार असल्याचे वृत्तही ‘लोकमत’ने दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने स्वत:च्या कंपनीला आठ रुपये दराने प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली आहे.
एजन्सी निवडीच्या गोंधळामुळे विद्यापीठ प्रशासनाला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. विद्यापीठाने यापूर्वी बहुपर्यायी प्रश्नांबरोबरच २० गुणांचे लेखी प्रश्न परीक्षेत विचारले जाणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच या प्रश्नांची उत्तरे एका कागदावर लिहून विद्यापीठाने दिलेल्या क्यूआर कोडवर अपलोड करावे लागणार होते. मात्र, एजन्सी बदलल्यामुळे विद्यापीठाने २० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता केवळ ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
--
२५ मार्चला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत १५ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा सुमारे पंधरा दिवस पुढे ढकलून येत्या ११ एप्रिलपासून घेण्याचा ठराव मंगळवारी झाला. येत्या २५ मार्च रोजी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ऑनलाइन पद्धतीने केवळ ५० गुणांची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ