नियमावलीत अडकली विद्यापीठाची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:49+5:302021-03-05T04:12:49+5:30
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा काही विशिष्ट नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे पुढे ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा काही विशिष्ट नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे पुढे ढकलाव्या लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, नियोजित कालावधीत परीक्षा होणार किंवा नाही, याबाबत निर्माण झालेला संभ्रम विद्यापीठाने दूर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्चपासून सुरू करण्याबाबत डिसेंबर महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा केली होती. त्यामुळे परीक्षेची तयारी डिसेंबर महिन्यापासूनच सुरू झाली होती. तसेच विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केली. परंतु, विद्यापीठाने परीक्षेसाठी एजन्सी निवडीची प्रक्रिया नियमानुसार केली नाही, अशी माहिती समोर आली. मात्र, विद्यापीठ परीक्षेच्या कामासाठी नवी एजन्सी निवडणार की विद्यापीठाच्या स्वत:च्या दोन कंपन्यांच्या मदतीने परीक्षा घेणार याबाबत विद्यापीठाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी निवडलेली एजन्सी मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा घेण्यास नियमानुसार पात्र ठरत नाही. तसेच या एजन्सीला परीक्षेचे काम देण्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आणि परचेस कमिटीने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षेच्या कामकाजासाठी निविदा काढून नवीन एजन्सी निवडावी लागणार आहे. परिणामी परीक्षा एक ते दीड महिने पुढे जाणार आहे. परंतु, विद्यापीठाने स्वत:च्या कंपन्यांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याबाबत चाचपणी केल्यास यातून मार्ग काढता येईल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.