विद्यापीठाकडून इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे यजमानपद काढून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 04:14 AM2018-12-14T04:14:06+5:302018-12-14T04:14:24+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यकारी समितीला विश्वासात न घेता परिषदेच्या तारखा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यकारी समितीला विश्वासात न घेता परिषदेच्या तारखा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परिषदेच्या सभासदांनी विद्यापीठाकडे भरलेले शुल्क परत करण्यास त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर परिषदेचे नवीन ठिकाण व तारखा लवकरच कळवू असे सभासदांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठावर ५५ वर्षांनंतर एका महत्त्वाच्या परिषदेचे आयोजन करण्याची संधी गमाविण्याची नामुष्की ओढावली आहे.
इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सचिव प्रा. महालक्ष्मी रामकृष्णन यांनी संकेतस्थळावर सभासदांसाठी पत्र पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निधी आणि सोयी-सुविधांअभावी परिषद नियोजित वेळेत आयोजित करणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले. विद्यापीठाने आयत्यावेळी समितीला विश्वासात न घेता परिषद पुढे ढकलली. या प्रकाराने समितीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे, तो विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्राद्वारे कळविण्यात आला आहे, तसेच सदस्यांनी भरलेली शुल्काची रक्कम तत्काळ परत करण्यास त्यांना सांगितले आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सभासदांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. त्याबरोबर परिषदेचे नवीन ठिकाण व तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे निधीअभावी डिसेंबर महिन्यात आयोजन करू शकत नाही. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात याचे आयोजन करू, असे पत्र इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यकारी समितीला मंगळवारी पाठविले होते. विद्यापीठाने अचानक घेतलेल्या या पवित्र्याने कार्यकारी समितीला मोठा धक्का बसला. निधीअभावी सध्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे आयोजन करणे शक्य नाही; मात्र येत्या फेब्रुवारी-मार्च २०१९ पर्यंत निधीचे संकलन करून ही परिषद घेता येऊ शकेल. परिषदेसाठी येणाऱ्या अभ्यासकांची व्यवस्था बालेवाडीच्या गेस्ट हाऊसमध्ये केली जाणार होती; मात्र सध्या तिथे खेलो इंडियाच्या स्पर्धा सुरू असल्याने गेस्ट हाऊस उपलब्ध झाले नाहीत. अभ्यासकांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करणे खूप खर्चिक ठरेल असे इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. राधिका सेशन यांनी स्पष्ट केले होते.
फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजन
डाव्या विचारसरणीच्या अभ्यासकांचे वर्चस्व असलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये केंद्र शासनाला अडचणीचे ठरू शकतील असे ठराव मंजूर केले जाण्याच्या भीतीने राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या दबावामुळे ही परिषद रद्द करण्यात आल्याचा आरोप इतिहास अभ्यासकांकडून केला जात आहे. निधी नसल्याचे कारण केवळ बहाणा असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत कुलगुरूंच्या वतीने बोलताना विद्यापीठाचे माध्यम समन्वयक म्हणाले, दबावामुळे परिषद रद्द झाल्याचे आरोप बिनबुडाचे असून, इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द करण्यात आली नसून, ती पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात त्याचे आयोजन केले जाणार आहे.
सगळे युवा महोत्सवात व्यस्त, इतिहास परिषदेकडे दुर्लक्ष
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे १९ ते २३ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनामध्ये विद्यापीठातील प्रमुख पदाधिकारी व अधिकारी सध्या व्यस्त आहेत. या महोत्सवासाठीही दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे; मात्र त्याला निधीची कोणतीही अडचण नाही; मात्र वैचारिक मंथन घडवून आणणाºया इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या आयोजनाकडे मात्र दुर्लक्ष झाले.
यजमानपद काढून घेणे अत्यंत अपमानकारक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंडियन हिस्ट्री काँग्रेस २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधित घेण्याची घोषणा केली होती. दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या परिषदेला दोन ते अडीच हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते. त्यांच्या प्रतिनिधी शुल्कातून मोठी रक्कम जमा होणार होती. उर्वरित रक्कम ही प्रायोजकत्व मिळवून जमा करायची होती. सहाशे कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असलेल्या विद्यापीठासाठीही किरकोळ बाब होती. विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट सदस्य अशी दिग्गजांची फळी असताना निधी जमविता आला नाही. त्यामुळे यजमानपद काढून घेण्याच्या अपमानाला सामोरे जावे लागले.