सोमवारपासून विद्यापीठाची सराव परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:00+5:302021-04-05T04:11:00+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा येत्या १० एप्रिलपासून ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा येत्या १० एप्रिलपासून सुरू होणार आहे. परंतु, तत्पूर्वी विद्यार्थ्यांना येत्या ५ ते ९ एप्रिल या कालावधीत मॉक टेस्टद्वारे परीक्षेचा सराव करता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने दिलेल्या मुदतीमध्ये मॉक टेस्ट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र, आता प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. अंतिम वर्षाची परीक्षा प्राॅक्टर्ड पद्धतीने घेणे शक्य झाले नव्हते. परंतु, यंदा सर्व विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
विद्यापीठाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन परीक्षेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी मॉक टेस्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी सोमवारपासून (दि.५) नमुना प्रश्न सोडवू शकतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक कार्यान्वित करणे आवश्यक आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीतच विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतील .
--
सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेला कालावधी
- विज्ञान व अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ५ एप्रिल रोजी सराव करू शकतील.
- केवळ वाणिज्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ६ एप्रिल रोजी सराव करता येईल.
- कला, फार्मसी, शिक्षणशास्त्र शारीरिक शिक्षण या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ७ एप्रिल रोजी सराव करू शकतील.
- ८ एप्रिल रोजी केवळ अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल.
- विधी आणि व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ९ एप्रिल रोजी सराव परीक्षा देऊ शकतील.
--
परीक्षेसाठी www.sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा. सराव परीक्षेसाठी युजरनेम व पासवर्ड मोबाइलवर एसएमएस केला जाणार आहे तसेच स्टुडन्ट प्रोफाईल सिस्टीम वरती पाठविला जाणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.