पुणे विद्यापीठ: क्रेडिट सिस्टीममध्ये बदल : आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:29 AM2017-12-21T06:29:37+5:302017-12-21T06:29:42+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जात असलेल्या क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार असून त्यातील सध्य स्थितीतील त्रुटी दूर करून आवश्यक बदलांसह नव्याने क्रेडिट सिस्टीम राबविली जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये यासंदर्भातील अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जात असलेल्या क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार असून त्यातील सध्य स्थितीतील त्रुटी दूर करून आवश्यक बदलांसह नव्याने क्रेडिट सिस्टीम राबविली जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये यासंदर्भातील अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) आदेशानुसार देशातील सर्व विद्यापीठांमध्ये क्रेडिट सिस्टीम राबविली जात आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राबविल्या जाणाºया क्रेडिट सिस्टीममध्ये आणि इतर विद्यापीठांमधील क्रेडिट सिस्टीममध्ये काही प्रमाणात तफावत असल्याचा अहवाल प्रा. एस. एस. घासकडबी यांनी विद्यापीठाला सादर केला. त्यात पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना १०० क्रेडिट, तर इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ८० क्रेडिट घ्यावे लागत असल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडून विद्यापीठातील विभागांमध्ये आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणा-या क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार आहे.
सायन्स व सोशल सायन्स यातील क्रेडिटमध्ये काही प्रमाणात तफावत आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना निवडलेल्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करण्यास अवधी मिळत नाही. तसेच प्राध्यापकांनाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक कालावधी मिळत नाही. या समितीकडून क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार आहे. विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. गायकवाड व प्रा. एस. एस. घासकडबी यांच्यासह आणखी एक सदस्य असलेल्या समितीकडे या संदर्भातील अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात या समितीकडून अहवाल विद्यापीठाला सादर करण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने क्रेडिट सिस्टीमबाबत काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना अधिकचे १० क्रेडिट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांवर ताण येऊ नये. या उद्देशाने सद्य:स्थितीतील क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जात आहे. तसेच शैक्षणिक दर्जा कायम ठेवत क्रेडिट सिस्टीममध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत.
- डॉ. एन. एस. उमराणी,
प्र-कुलगुरू, सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ