‘ऑक्सिपार्क’वरून विद्यापीठाची पुन्हा कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:08+5:302021-06-28T04:09:08+5:30
विद्यापीठाने उत्पन्नवाढीसाठी ऑक्सिपार्क या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क घेण्याचे निश्चित केले होते. ...
विद्यापीठाने उत्पन्नवाढीसाठी ऑक्सिपार्क या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क घेण्याचे निश्चित केले होते. एका नागरिकाकडून वर्षाला १० हजार रुपये शुल्क आकारले जाणार होते. मात्र, विद्यापीठात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले जाणार असल्याने त्यावरून वाद निर्माण झाला होता. तसेच सर्वच क्षेत्रांतून या विरोध टीका केली जात होती. त्यामुळे सामंत यांनी त्वरित ही योजना स्थगित करण्याचे विद्यापीठाला आदेश दिले होते. परंतु, सामंत यांच्याकडून पुणे विद्यापीठाला जाणूनबुजून लक्ष केले जात असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात होती. मात्र,रविवारी पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सामंत म्हणाले, विद्यापीठात फिरण्यासाठी येणा-या नागरिकांकडून शुल्क घेणे योग्य नाही. याबाबत माझ्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. नागरिकांच्या हितासाठी विद्यापीठाचा रोष ओढवून घेण्याची माझी तयारी आहे.परंतु,मी कोणावर दबाव आणला नाही किंवा कोणाशी भांडलो नाही. एकही झाड न लावता वाढलेल्या झाडाची किंमत करून त्याचे पैसे घेणे योग्य उचित नसल्याचे विद्यापीठाच्या अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना पटले. त्यामुळे विद्यापीठाने सुद्धा या योजनेस स्थगिती दिली.