विद्यापीठाने छायांकित प्रत, पुनर्मुल्यांकन शुल्कवाढ मागे घ्यावी ;संघटनांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:38 PM2020-02-22T15:38:05+5:302020-02-22T15:59:41+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या आणि पुनर्मुल्यांकनाच्या शुल्कात प्रत्येकी ५० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. तसेच विद्यापीठ ही विद्यार्थ्यांची पिळवणूक करून अवाजवी नफा कमावणारी संस्था नाही, त्यामुळे विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विविध संस्था संघटनांकडून केली जात आहे.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या आणि पुनर्मुल्यांकनाच्या शुल्कात प्रत्येकी ५० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. तसेच विद्यापीठ ही विद्यार्थ्यांची पिळवणूक करून अवाजवी नफा कमावणारी संस्था नाही, त्यामुळे विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विविध संस्था संघटनांकडून केली जात आहे.
विद्यापीठाने येत्या मार्च-एप्रिलपासून उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या आणि पुनर्मुल्यांकनाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार यापुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी २०० रुपये तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या छायांकित प्रतीसाठी १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून पुनर्मुल्यांकनासाठी २५० रुपये आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून २०० रुपये शुल्क आकारले जाईल,असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.मात्र,व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी वेगळे शुल्क घेणे नैसर्गिक न्यायाला धरून नाही.
काही वर्षांपूर्वी विद्यापीठाने अकारण नियमात बदल करुन पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा असेल तर आधी उत्तरपत्रिकेची छायांकीतप्रात घेतलीच पाहिजे, असा अतार्किक नियम केला. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याने दुप्पट वेळही वाया जात आहे. शुल्कवाढीमुळे पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना आता छायांकित प्रतीसाठी ५० आणि पुनर्मुल्यांकणासाठी ५० असे जास्तीचे १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एवढा भुर्दंड सोसून विद्यार्थ्यांच्या गुणात बदल झाला आणि विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर संबंधित विद्यार्थ्याला त्याने भरलेले शुल्क परत मिळत नाही. एकूणच विद्यापीठ आपली चूक विद्यार्थ्यांच्या शुल्कातून सुधारून घेत आहे. तसेच या कालावधीत विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यापीठाने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा,अशी मागणी साजग नागरिक मंचतर्फे करण्यात आली आहे.
विद्यापीठाने व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे छायांकित प्रतीचे शुल्क समान पातळीवर आणावे. पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करताना पहिल्यांदा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेतलीच पाहिजे ही जाचक अट काढून टाकावी. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला तर मूळ पेपर तपासताना विद्यापीठाकडून चूक झाली आहे, असे गृहीत धरून विद्यार्थ्यांकडून छायांकित प्रतीसाठी आणि पुनर्मुल्यांकनासाठी आकारले शुल्क परत करावे. तसेच परिपत्रक रद्द करून शुल्कवाढ मागे घावी.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
सर्व सामान्य विद्यार्थांना वाढत्या महागीच्या काळात शिक्षण घेणे कठीण होत चालले आहे.त्यात विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ ही अन्यायकारक आहे. विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा विचार करून उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या आणि पुनर्मुल्यांकनाच्या शुल्कात केलेली वाढ मागे घ्यावी.
- संतोष ढोरे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठाने उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या आणि पुनर्मुल्यांकनाच्या शुल्कात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय चूकीचा आहे. विद्यापीठाने शुल्कवाढीच परिपत्रक मागे घ्यावे.अन्यथा विद्यापीठाविरोधात मनविसेतर्फे आंदोलन केले जाईल.
कल्पेश यादव ,अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,पुणे शहर