आरोग्य क्षेत्राच्या कक्षा रुंदविण्यासाठी विद्यापीठाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:22+5:302021-04-28T04:12:22+5:30

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील माहितीची, ज्ञानाची, अभ्यासाची अधिकाधिक देवाण घेवाण होऊन त्यात भरीव काम व्हावे; यासाठी ...

University steps to widen the scope of health sector | आरोग्य क्षेत्राच्या कक्षा रुंदविण्यासाठी विद्यापीठाचे पाऊल

आरोग्य क्षेत्राच्या कक्षा रुंदविण्यासाठी विद्यापीठाचे पाऊल

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील माहितीची, ज्ञानाची, अभ्यासाची अधिकाधिक देवाण घेवाण होऊन त्यात भरीव काम व्हावे; यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आरोग्य क्षेत्रातील अभ्यासाच्या संधी वाढविण्यात आल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला असून या करारानुसार या दोन्ही विद्यापीठांमधील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाची, अभ्यासाची देवाण घेवाण करता येणार आहे.

मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, नवोपक्रम व नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, आरोग्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. आरती नगरकर, आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के.डी. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ श्रीकांत देशमुख, डॉ. डी. जी. बागल, आर.टी.आहेर, डॉ.मयूर गिरी आदी उपस्थित होते.

या करारामुळे, दोन्ही विद्यापीठांमधील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांमध्ये अध्ययन, शिबीरे, कार्यशाळा, परिषदा व अन्य अभ्यासाविषयीच्या कार्यक्रमांचे आदान प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एकत्रितरित्या संशोधन, माहितीची देवाण घेवाण आदी गोष्टी करता येणार आहेत.

------------

सध्याच्या काळात आरोग्य क्षेत्रात काम करत असताना एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची खूप गरज आहे. यातूनच नवे मार्ग मिळू शकतील. अशा कराराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात योगदान देण्याचा दोन्ही विद्यापीठांचा प्रयत्न आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान

Web Title: University steps to widen the scope of health sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.