स्वत:च्या कंपनीकडून परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:20+5:302021-03-07T04:11:20+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणा-या परीक्षा नियोजित कालावधीत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणा-या परीक्षा नियोजित कालावधीत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे परीक्षा केव्हा घ्याव्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक घ्यावी, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून स्वत:च्या कंपन्यांकडून परीक्षा घेणे शक्य आहे का? याबाबत चाचपणी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा १५ मार्चपासून घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच जुन्या एजन्सीच्या सहकार्याने परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार परीक्षा विभागाने सुद्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र, नवीन एजन्सी निवडून परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
-----------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या येत्या १० मार्च रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये परीक्षेसंदर्भात सर्व धोरणात्मकबाबींवर अंतिम निर्णय होईल, असा मला विश्वास वाटतो.
- राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------
विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला होता. मात्र, नियोजित कालावधीत परीक्षा घेणे शक्य नसल्यास पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक घेऊन परीक्षांच्या सुधारीत वेळापत्रकावर चर्चा करावी.
- डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
------------------------
...तर विद्यापीठाचा खर्च वाचणार
जुन्या कंपनीकडून विद्यापीठाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने स्थापन केलेल्या कंपन्यांच्या मदतीने परीक्षा घेता येऊ शकतात का? याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून चाचपणी केली जात आहे. त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेता आल्या तर विद्यापीठाचा खर्च वाचणार आहे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे.
---------------------