विद्यापीठ देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:00 AM2019-08-07T07:00:00+5:302019-08-07T07:00:02+5:30
आपत्ती व्यवस्थापन हा विषय मर्यादित विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
- राहुल शिंदे -
- लोकमत न्यूज नेटवर्क-
पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने गेल्या दोन तपापासून विद्यार्थ्यांकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी जमा केलेली ९ कोटी रुपये रक्कम खरंच केली नसल्याची धक्का दायक माहिती समोर आली आहे. मात्र, उशिरा का होईना विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून सर्व विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे १९९५ पासून विद्यापीठाच्या तिजोरीत पडून असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम अखेर चांगल्या कामासाठी कारणी लागणार आहेत.
राज्याच्या तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकी १० रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून १० रुपये रक्कम जमा करण्यास सुरूवात केली.त्यामुळे राज्यातील प्रत्येक विद्यापीठाकडे कोट्यवधी रूपये जमा झाले आहेत.त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे ९ कोटी रुपये पडून आहेत.मात्र,‘आव्हान’ सारख्या शिबिरांचे आयोजन करून १२०० विद्यार्थ्यांना कमी-अधिक प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण देण्यापलिकडे पुणे विद्यापीठाने काहीही केले नाही. परंतु, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या सूचनेनुसार विद्यापीठात आता आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
चाकणे म्हणाले, विद्यापीठाच्या आव्हान शिबिरातून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी सध्या मुंबई,सांगली आदी भागात मदतकार्य करत आहेत. मात्र,आपत्ती व्यवस्थापन हा विषय मर्यादित विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपतकालीन परिस्थितीत अफवा पसरल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना आपत्ती पूर्वीचे प्रशिक्षण,आपत्ती काळात काय करू नये याचे प्रशिक्षण,आपत्ती आल्यानंतर काय करावे आणि आपत्तीनंतर पुनर्वसन काळातील प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठीच विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला जाणार असून हा कक्ष विद्यापीठातील अध्यासनाप्रमाणे काम करणार आहे.
विद्यापीठाकडे जमा असलेल्या नऊ कोटी रुपयांमधून मिळणा-या व्याजाच्या रक्कमेवर व्यवस्थापन कक्षाचे कामकाज सुरू ठेवले जाईल. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ)च्या सहकार्याने विद्यापीठाशी संलग्न सर्व प्राध्यापकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्राध्यापकांना प्रशिक्षण दिल्यानंतर हे प्राध्यापक ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. त्यानंतर प्रशिक्षित विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतील.तसेच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम अनिवार्य करण्याबाबत विद्यापीठाकडून विचार केला जात आहे,असेही चाकणे यांनी सांगितले.
------------