प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विद्यापीठ आज घेणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:07+5:302021-04-29T04:07:07+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा विद्यापीठातर्फे घेतल्या जात ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा विद्यापीठातर्फे घेतल्या जात आहेत. सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण निकालासाठी ग्राह्य धरले जातात. परंतु, कोरोनामुळे प्रॅक्टिकल घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलचे गुण कसे द्यावेत, याबाबतचा पेच निर्माण झाला आहे. वर्षाखेरीस प्रॅक्टिकलचे गुण विद्यापीठाकडे महाविद्यालयांनी जमा करावेत, अशा स्वरूपाचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु, प्रॅक्टिकल परीक्षा झालेल्या नसताना विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रॅक्टिकलचे गुण ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याबाबत सुचना दिल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.
कोरोनामुळे सध्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागत आहेत. प्रथम सत्राच्या परीक्षा संपल्यावर काही दिवसांच्या कालावधीनंतर द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू कराव्या लागणार आहेत. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण कसे द्यावेत? याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठीच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
------------------------
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखे अंतर्गत येणाऱ्या सर्व अभ्यास मंडळाच्या सदस्यांची गुरुवारी बैठक बोलावण्यात आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्याव्यात व त्यांना गुण कोणत्या पद्धतीने द्यावे याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- डॉ.एम.जी.चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ