विद्यापीठाचा अर्थसंकल्प शनिवारी होणार सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:10+5:302021-03-19T04:11:10+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या येत्या २० मार्च रोजी होणाऱ्या ऑनलाइन अधिसभेच्या बैठकीत विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या येत्या २० मार्च रोजी होणाऱ्या ऑनलाइन अधिसभेच्या बैठकीत विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या ठेवींमध्ये घट झाल्याने विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पातून विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयांना काय मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे विद्यापीठाच्या २०१६-१७ पासून २०१९-२० पर्यंतच्या अर्थसंकल्पात सातत्याने घट होत असल्याचे दिसून आले. मात्र, मागील वर्षी २०२०-२१ चा अर्थसंकल्प ६६२. ४६ कोटी आणि ५९.५० कोटी तुटीचा सादर करण्यात आला. परंतु, कोरोनामुळे विद्यापीठाच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली. विद्यापीठाला परीक्षा विभागाकडून सर्वाधिक उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे विद्यापीठाला परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे विद्यापीठाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्याचप्रमाणे बँकांच्या व्याजदरात घट झाल्याने विद्यापीठाला ठेवी मधून मिळणारे उत्पन्न सुद्धा घटले. त्यामुळे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.
विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यामुळे शिष्यवृत्तीमध्ये कपात केली जाणार का? शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना बंद होणार का? विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांसाठी गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. परंतु ,गेल्या वर्षी या योजनेचा निधी कमी केला होता. त्यात यंदा आणखी घट केली जाणार आहे का? आदी प्रश्नांची चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात चर्चा केली जात आहे.
-----
विद्यापीठ अधिसभेची बैठक ऑनलाइन होणार आहे. या बैठकीदरम्यान काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी शुक्रवारी दुपारी बैठकीची रंगित तालीम घेतली जाणार आहे.
---
गेल्या पाच वर्षाच्या अर्थसंकल्पाची आकडेवारी (रक्कम कोटीमध्ये)
शैक्षणिक वर्ष अर्थसंकल्प तूट
२०१६-१७ ६९४.७४ १२०.७२
२०१७-१८ ६८८.३८ १००.३२
२०१८-१९ ६५९.९९ ६२.२६
२०१९-२० ६४५.६६ ४२.७९
२०२०-२१ ६६२.४६ ५९.५०