विद्यापीठाची कोविड तपासणी प्रयोगशाळा २९ एप्रिलपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:06+5:302021-04-22T04:11:06+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोविड निदानासाठी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोविड निदानासाठी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी केली. मात्र, काही उपकरणे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठापर्यंत पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे विद्यापीठाला एनएसबीएल ॲक्रेडिटेशन मिळू शकेल नाही. परंतु, आता विद्यापीठाने प्रयोगशाळेच्या मान्यतेसाठीची प्रक्रिया सुरू केली असून, येत्या गुरुवारपासून प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, असा विश्वास विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दररोज सुमारे १०० रुग्णांची तपासणी करणे शक्य होणार आहे.
पुणे शहरात रोज सुमारे २० हजारपेक्षा जास्त नमुने घेतले जात असल्याने त्याचा ताण प्रयोगशाळांवर येत आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची रोजची क्षमता सुमारे ४०० ते ५०० आहे. मात्र, सुरुवातीला १०० चाचण्या घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडे प्रयोगशाळेत काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवरून प्रयोगशाळेसाठी लागणारी सर्व उपकरणे विद्यापीठाने मिळवली आहेत. त्यामुळे आता केवळ मान्यतेची प्रतीक्षा आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत एएफएमसीचे अधिकारी प्रयोगशाळेची तपासणी करून प्रयोगशाळेला मान्यता देतील, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
------
पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेला ‘एनएबीएल’ची मान्यता नसल्याने चाचण्या घेण्यास सुरुवात केली नव्हती. परंतु, एनएबीएलऐवजी एएफएमसीकडून मान्यता घेतली जात आहे. त्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया विद्यापीठाने पूर्ण केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही प्रयोगशाळांना कार्यान्वित होईल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
------