विद्यापीठाचा अभियांत्रिकीचा पेपर फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 08:01 PM2018-05-23T20:01:25+5:302018-05-23T20:01:25+5:30
पेपर फुटला नाही, मात्र काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असल्याची शक्यता असून यासंदर्भात आवश्यकता भासल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून पेपर फोडल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी पुन्हा एका आभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा ‘इंजिनिअरींग मेकॅनिक्स’ या विषयाचा पेपर फुटला आहे. सातत्याने पेपर फुटत असल्याने हे प्रकार दडपण्याचे प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केले जात असून पेपर फुटीची अफवा असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे.
अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वषार्चा ‘इंजिनिअरींग मेकॅनिक्स’ या विषयाचा सकाळी १० ते १२ या वेळेत पेपर होता. काही महाविद्यालयांमधून हा पेपर दहाच्या सुमारास व्हायरल झाला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक अशोक चव्हाण यांनाही त्या पेपरची प्रत पाठविण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोथरूडमधील एमआयटी महाविद्यालयामध्ये पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
इंजिनिअरींग मेकॅनिक्स या विषयाचा पेपर फुटला नाही, मात्र काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असल्याची शक्यता असून यासंदर्भात आवश्यकता भासल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. तसेच, यामध्ये महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.
हा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास पोलिसांमध्ये तक्रार देण्यात असून खोडसाळपणा करणाऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच, याबाबत महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाचे वेबमेल हॅक करून पेपर फोडण्यात आल्यानंतर तरी पेपर फुटीच्या घटनांना आवर घातला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ती फोल ठरल्याचे दिसून येत आहे.