विद्यापीठाची एमिनन्सची संधी थोडक्यात हुकली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 09:47 PM2019-08-03T21:47:51+5:302019-08-03T21:48:33+5:30
शैक्षणिक संस्थांची आयओईची यादी जाहीर होण्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समावेशाबाबत जोरदार चर्चा केली..
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाची इन्स्टिट्यूशन्स ऑफ एमिनन्स (आयओई)च्या यादीत समाविष्ठ होण्याची संधी थोडक्यात हुकला असून प्राध्यापकांची संख्या व घसरलेले क्यूएस रँकिंग यामुळे विद्यापीठाला एमिनन्सचा दर्जा मिळाला नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. मात्र, कोलकता येथील जाधवपूर युनिव्हर्सिटी आणि चेन्नईच्या अण्णा युनिव्हर्सिटीच्या आयओई मधील समावेशावर पुणे विद्यापीठाचे आयओईचा यादीत नाव येणार किंवा नाही, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
विविध शैक्षणिक निकषांच्या आधारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील शैक्षणिक संस्थांना प्रतिष्ठित संस्थांचा ‘आयओई’ दर्जा देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने देशातील १५ सरकारी व १५ खाजगी अशा एकूण ३० शैक्षणिक संस्थाची शिफारस आयओई दर्जा देण्यासाठी केली. त्यानंतर मंत्रालयाने आयओई योजनेंतर्गत १० सरकारी व १० खाजगी संस्थांना मान्यता दिली आहे. शासकीय संस्थांना प्रत्येकी आक हजार कोटी रुपये मिळणार असून राज्यातील आयआयटी मुंबईला यापूर्वीच हा दर्जा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्य विद्यापीठ असूनही गुणवत्तेच्याबाबतीत आयआयटी व केंद्रीय विद्यापीठाशी चांगली स्पर्धा केली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
शैक्षणिक संस्थांची आयओईची यादी जाहीर होण्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समावेशाबाबत जोरदार चर्चा केली. विद्यापीठाने आयआयटी व केंद्रीय विद्यापीठांशी विविध पातळ्यांवर चांगली स्पर्धा केली तर काही निकषांबाबत बरोबरी केली. आयओई यादीत जाधवपूर युनिव्हर्सिटी आठव्या क्रमांकावर अण्णा युनिव्हर्सिटी नवव्या, बनारस हिन्दू युनिव्हर्सिटी दहाव्या तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अकराव्या क्रमांकावर आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तेची जोरदार स्पर्धा झाल्यामुळे समितीच्या सदस्यांनी क्यूएस रँकिंगचा विचार केला. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी विद्यापीठाचे रँकिंग घसरल्याचा फटका विद्यापीठाला बसला. त्यामुळे विद्यापीठाला आयओईचा दर्जा मिळाला नाही.
विद्यापीठांना आयओई दर्जा देण्यापूर्वी केंद्राकडून संबंधित राज्य शासनाशी चर्चा केली जाणार असून एक हजार कोटींपैकी ५०० कोटी रुपयांचा खर्च उचलण्यास राज्य शासनाने तयारी दर्शविल्यानंतरच एमिनन्सचा दर्जा दिला जाणार आहे. त्यामुळे जाधवपूर युनिव्हर्सिटी किंवा अण्णा युनिव्हर्सिटी यापैकी एकाही विद्यापीठाकडून खर्च उलचण्यास असहमती दर्शवली गेली तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आयओईचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
.......
आयओईचा दर्जा मिळालेल्या शासकीय संस्था-आयआयटी मुंबई , आयआयटी दिल्ली, आयआयएससी बेंगळूर, आयआयटी मद्राास, आयआयटी खडकपूर, दिल्ली विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, अण्णा विद्यापीठ, बीएचयु वाराणसी
--------
आयओईचा दर्जा मिळालेल्या खासगी संस्था-बिट्स पिलानी-राजस्थान, मनिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, जीओ इन्स्टिट्यूट ,अम्रीता विश्व विद्यापीठम बेंगळूर, व्हिआयटी व्हेल्लोर ,जामीया हमदर्द -नवी दिल्ली, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी-भुवनेश्वर, ओ.पी.जिंदाल विद्यापीठ-हरियाणा, शिव नादर विद्यापीठ-उत्तर प्रदेश, भारती (सत्यभारती फाउंडेशन) दिल्ली