विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याचे आंदोलन
By Admin | Published: October 16, 2015 01:24 AM2015-10-16T01:24:07+5:302015-10-16T01:24:07+5:30
विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याचे आंदोलन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी पदोन्नतीसाठी कुलगुरू कार्यालयात अचानक ठिय्या आंदोलन केले. मात्र, नियम डावलून कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे शक्य नसल्याने विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांची समजूत काढावी लागली. यावरून सुरक्षा विभागाचे अधिकारी आपल्याला मिळालेल्या पदावर समाधानी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या हातात विद्यापीठाची सुरक्षा देणे योग्य आहे का, असा सवाल विद्यापीठ वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या नियमावलीनुसार आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठ प्रशासनाने वर्ग एकच्या पदावर बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला उपकुलसचिव पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. मग मलाही उपकुलसचिव किंवा तत्सम पदावर नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याने कुलगुरू कार्यालयात येऊन ठिय्या दिला. विद्यापीठाचे कुलगुरू काही कामासाठी बाहेरगावी गेलेले असताना संबंधित अधिकाऱ्याने कुलगुरू कार्यालयात येऊन अचानक आंदोलन करण्याचा प्रवित्रा घेतल्याने सर्वांचाच गोंधळ उडाला. परिणामी, संबंधित अधिकाऱ्याची समजूत काढण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू व महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी कुलगुरू कार्यालयात धाव घेतली. सुरक्षा विभागातील अधिकाऱ्याला प्रशासनातील इतर पदावर नियुक्ती देणे नियमात बसत नाही. तरीही, संबंधित अधिकाऱ्याने अशा प्रकारची मागणी केली, हे हास्यास्पद असल्याचे मत विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी मांडले. (प्रतिनिधी)