निर्दयी बापाने पोटच्या मुलीला बुडवले कालव्यात; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:50 AM2023-02-11T11:50:50+5:302023-02-11T11:51:46+5:30
निर्दयी बापाने पोटच्या मुलीला स्वारगेट परिसरातील मुठा उजवा कालव्यात बुडवून ठार मारले....
पुणे : आई-वडील वेगळे राहत असूनही, वडिलांवर आई इतकाच जीव असल्याने मुलगी वडिलांबरोबर गेली ती कायमचीच. निर्दयी बापाने पोटच्या मुलीला स्वारगेट परिसरातील मुठा उजवा कालव्यात बुडवून ठार मारले. ती ’वाचवा वाचवा’ असा टोहा फोडत असतानाही वडिलांनी निष्ठूरपणे कालव्यात उतरून तिला पुन्हा पाण्यात बुडविले. ही घटना शुक्रवारी (दि. १०) पहाटे ३.३० च्या सुमारास सारसबाग चौकातील सावरकर पुतळ्याच्यामागे कालव्यात घडली.
संदीप विष्णू शिंदे (वय ४०,रा. धनकवडी) असे या निर्दयी वडिलांचे नाव आहे. मुलीने प्राण सोडल्यानंतर वडिलांनीही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी मुलीची आई वृषाली शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यावरून स्वारगेटपोलिसांनी संदीप शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, संदीप शिंदे हा रिक्षाचालक आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. संदीपचा वृषाली यांच्याबरोबर २००७ मध्ये विवाह झाला. कौटुंबिक कारणातून दोघांमध्ये वाद सुरु होता. गेल्या दोन वर्षांपासून दोघे वेगळे राहत होते. मुलगी काही दिवस आईकडे, तर काही दिवस वडिलांकडे राहत होती. पत्नीने संदीप याला विभक्त होण्याची नोटीस पाठवली होती. त्यामुळे तो चिडून होता. गुरूवारी तो पत्नी राहत असलेल्या आंबेगाव पठार येथून मुलीला घेऊन धनकवडी येथील घरी आला. त्यानंतर रात्रीच त्याने पत्नीच्या मोबाईलवर फोन करून मी मुलीला संपविणार असे सांगितले. त्यामुळे पत्नीने पतीचे धनकवडी येथील घर गाठले. पती आणि मुलगी तनुश्री घरी मिळून आले नाहीत. त्यांनी याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
दरम्यान, संदीप हा मुलीला घेऊन शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास स्वारगेट परिसरातील मुठा उजवा कालवा येथे आल्यानंतर त्याने मुलीला कालव्यात ढकलून दिले. हा सर्व प्रकार तेथील मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर बाप तेथून निघून गेला. दोघे घरी नसल्यामुळे त्याचे मित्र आणि नातेवाईक शोध घेत होते. संदीप याचा फोन लागत होता. पंरतु तो उचलत नव्हता. शेवटी त्याने एक फोन उचलल्यानंतर तो मित्रमंडळ चौकात असल्याचे समजले. मित्रांनी तेथे त्याला गाठले. तेव्हा त्याने मुलीचा खून केल्याचे सांगत स्वत: विष प्राशन केल्याचे सांगितले. मित्रांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत स्वारगेट पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. सकाळी सातपासून, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेहाचा शोध सुरू केला होता. अखेर दुपारी तीनच्या सुमारास मुलीचा मृतदेह मिळून आला. नातेवाईकांनी तेथे धाव घेत मोठ्याने हंबरडा फोडला.
मुलांसमोर वादविवाद टाळा :
सध्या विभक्त कुटुंबपद्धती वाढत आहे. मूल नक्की कोणाकडे ठेवायचे, असा वाद दोघांमध्ये निर्माण होतो. त्यातून मुलांची ओढाताण होते. आपल्यापासून मुले दूर जाऊ नयेत, यासाठी दोघांकडून प्रयत्न होतात. या वादाच्या परिणामामुळे दारूच्या व्यसनालाही जवळ केले जाते. मुलांसमोर दारू पिणे, त्यांच्यासमोर आईला मारहाण करणे, हे प्रकार घडताना दिसतात. त्या भांडणाचा मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो. रागाच्या भरात मुलांनाही इजा करण्याच्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी आई-वडिलांनी मुलांसमोर वादविवाद टाळायला हवेत. सामोपचाराने मार्ग काढावा. एकमेकांसाठी अपशब्द टाळावेत. घरातले वातावरण मुलांसाठी आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- करुणा मोरे, समुपदेशक.