विवाहेच्छूंना अवैध बांधकामांचा ‘मंगळ’
By admin | Published: February 11, 2015 01:04 AM2015-02-11T01:04:15+5:302015-02-11T01:04:15+5:30
विवाह जुळविण्याच्या वेळी कांदेपोहे कार्यक्रम सुरू असताना, काही औपचारिक प्रश्न विचारण्याची पद्धत रूढ आहे. मुलाला नोकरी,
संजय माने, पिंपरी
विवाह जुळविण्याच्या वेळी कांदेपोहे कार्यक्रम सुरू असताना, काही औपचारिक प्रश्न विचारण्याची पद्धत रूढ आहे. मुलाला नोकरी, व्यवसायाबाबतची चौकशी केली जाते. मुलगी असेल तर तिची आवड-निवड विचारली जाते... मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये अलीकडच्या काळात घर स्वत:चे आहे; परंतु ते अधिकृत आहे का? याची खास चौकशी, विचारणा होऊ लागल्याने अनधिकृत बांधकाम ही बाब पिंपरी-चिंचवडमधील विवाहेच्छुकांचा विवाह जुळविण्यात मोठी अडचण ठरू लागली आहे.
दुमजली-तीनमजली इमारत पाहून ‘पार्टी’ मालदार, सधन आहे, अशी समजूत विवाहाच्या निमित्ताने मुलगा वा मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्या मंडळीची होत असे. घर आणि सांपत्तिक स्थिती विचारात घेऊनच विवाह जुळविण्यास प्राधान्य दिले जाते. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अशा मोठ्या इमारती, रो हाऊस बांधलेले दिसले, तरी ते अधिकृत असेल की नाही, अशी शंका विवाह जुळविणाऱ्यांच्या मनात निर्माण होते. मनात निर्माण झालेले हे शकांचे काहूर ‘कांदेपोहे’ कार्यक्रमावेळी बाहेर पडते.
नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आवड-निवड, पत्रिका जुळणे, अनुरूपता यासंबंधीचे प्रश्न विचारले जातातच, शिवाय घर स्वत:चे आहे, पण बांधकाम ‘रेडझोन’मध्ये तर येत नाही ना, परिसरात जवळच नदी अथवा ओढा दिसून आल्यास घराचे बांधकाम पूरनियंत्रण रेषेत तर येत नाही ना, महापालिकेची कारवाईबाबतची नोटीस आली आहे का, असे प्रश्न हमखास विचारले जातात. वाहनतळापासून ते गच्चीपर्यंत फेरफटका मारल्यानंतर कागदपत्रे पाहण्याची इच्छा जरी व्यक्त केली नाही, तरी घर अधिकृत आहे, की अनधिकृत हे विचारण्याचे धाडस आवर्जून दाखवले जाते. कारण ज्या घरात मुलगी द्यायची ते घर अनधिकृत असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. पुढील काळात होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही, हा विचार त्यांच्या मनाला अस्वस्थ करतो. अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत विविध भागातील मोठ्या इमारतींची बांधकामे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. भूईसपाट झाली. त्यामुळे उघड्यावर पडलेले संसार, हक्काचे घर गेल्यामुळे नागरिकांचा झालेला आक्रोश ही दृश्ये पाहिल्याने मुला-मुलीचे भवितव्य घडविताना वरकरणी दिसणाऱ्या, भुरळ पाडणाऱ्या सांपत्तिक स्थितीपेक्षा त्या मालमत्तेच्या
वैधानिक स्थितीला महत्त्व दिले जात आहे. ही परिस्थिती देशात, राज्यात कोठेही नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र या कटू अनुभवातून अनेकांना जावे लागत आहे. गेल्या वर्षी थेरगाव परिसरात आदल्या दिवशी विवाहसोहळा झाला आणि दुसऱ्याच दिवशी दारातील मंडप सोडण्यापूर्वीच वधुपक्षाच्या घरावर अतिक्रमणविरोधी पथकाचा हातोडा पडला.