पाकशी चर्चा थांबविणे दुर्दैवी - दुलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:41 AM2018-04-23T01:41:23+5:302018-04-23T01:41:23+5:30
दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे.
पुणे : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी काश्मिरींमध्ये विश्वास निर्माण केला होता. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवून संबंध सुधारण्यात येतील. काश्मीर भारतातच राहील, हा विश्वास दिल्याने वाजपेयींवर काश्मीरींचे प्रेम होते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तसे होऊ शकले नाही. चर्चा थांबवून आपण चूक करत असून हे दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी रविवारी व्यक्त केले.
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी ‘काश्मीर आणि पाकिस्तान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंत गाडगीळ व विश्वस्त डॉ. महेश तुळपुळे आदी उपस्थित होते.
पाकिस्तानमधील सद्यस्थिती खूप वाईट असल्याचे सांगत दुलत म्हणाले, दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे. काश्मीरची स्थितीही चांगली नाही. दक्षिण काश्मीरमध्ये तरुण दहशतवादी बनत आहेत. असे असले तरी काश्मीर भारतातच राहील. काश्मिरींना न्याय, सन्मानाची वागणूक आणि आपलेपणाची भावना हवी आहे. सध्या हे दिसत नसल्याने ते आझादीची भाषा करत आहेत.