पुण्यात आयपीएलच्या केकेआर संघातील खेळाडूवर विनामास्कची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:15 PM2021-05-28T17:15:00+5:302021-05-28T17:17:00+5:30
चारचाकी चालवणार्या के के आर संघाच्या राहुल त्रिपाठीवर ५०० रुपयांचा दंड
पुणे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. अभिनेते, दिग्गज व्यक्ती, राष्ट्रीय - आंतराराष्ट्रीय खेळाडू आणि सामान्य नागरिक कोणालाही यामध्ये सूट दिली जात नाही. एखादा व्यक्ती विनामास्क फिरताना दिसल्यास पोलिस थेट कारवाई करत आहे. आज दुपारच्या सुमारास पुण्यात के के आर संघाचा खेळाडू राहुल त्रिपाठी चारचाकी वाहनातून विनामास्क जात होता. त्यावेळी कोंढवा पोलिसांनी त्याच्यावर ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
या कारवाई बद्दल कोंढवा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक संतोष सोनावणे म्हणाले की, कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आम्ही विनामास्क फिरणार्या नागरिकांवर कारवाई करत होतो. त्यावेळी चारचाकी वाहनातून एक व्यक्ती विना मास्क असल्याचे दिसून आले.
त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, ते सासवड येथून खडकी येथे जात होते. मी के के आर संघाकडून खेळत असून माझ नाव राहुल त्रिपाठी आहे. त्यावर आम्ही एकच म्हटले, आपणास दंड भरावा लागेल. त्यानंतर त्याने ५०० रुपयांचा दंड भरून घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.