विना मास्क फिरणारे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या 'रडार' वर; तपासणी होणार अधिक कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 09:25 PM2021-02-17T21:25:28+5:302021-02-17T21:29:27+5:30
दिवाळीनंतर शहरात बुधवारी प्रथमच सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित..
पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. बुधवारी दिवाळीनंतर प्रथमच सर्वाधिक नवीन
कोरोनाबाधित आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर अधिक कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक करण्यात आला होता. विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार विना मास्क फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु होती. दरम्यान, महापालिकेने मोटारीतून जाणाऱ्यांना मास्कचा वापरावरील बंधन दूर केले. त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांमधील निष्काळजीपणा वाढत गेला आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या विनामास्क कारवाईला पोलिसांकडून शिथीलता आल्यासारखे दिसून येत होते.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी
वावरताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क आवश्यक वापरावा. विनामास्क फिरणार्यांची तपासणी अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
\\\\\\\
विना मास्क कारवाईत २१ कोटींचा दंड वसूल
पुणे शहरात मास्क न घालणाऱ्या विरोधात पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते. आतापर्यंत पुणे शहरात मास्क न घालणाऱ्या २ लाख ५१ हजार ८६६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ कोटी २४ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे.