कलांचा मिलाफ अवर्णनीय
By admin | Published: April 29, 2017 04:22 AM2017-04-29T04:22:02+5:302017-04-29T04:22:02+5:30
कलेचे सादरीकरण हा कलाकाराचा आत्माविष्कार असतो. प्रत्येक कलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. कलावंत कलांमधील सीमारेषा पुसून टाकतो.
पुणे : कलेचे सादरीकरण हा कलाकाराचा आत्माविष्कार असतो. प्रत्येक कलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. कलावंत कलांमधील सीमारेषा पुसून टाकतो. सध्याचे प्रेक्षकही अभिजात कलांबाबत जाणकार होत आहेत. कथक नृत्याचा आनंद घेणारे रसिक आणि लावणीला दाद देणारे रसिक यांच्यामुळेच कलांना अधिष्ठान प्राप्त झाले. विविध नृत्यकलांचा हा मिलाफ अवर्णनीय आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी काढले.
लोकरंग सांस्कृतिक मंच आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ढेरे यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट निर्माते मिलिंद लेले उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पवार यांना परांजपे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. शकुंतला नगरकर यांच्या वतीने त्यांची कन्या श्रद्धा काळे यांनी पुरस्कार स्वीकारला.
मिलिंद लेले म्हणाले, ‘विविध कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कारकीर्द घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेताना गुण वाढवून मिळणार आहेत. त्याचप्रमाणे, गुणपत्रिकेवर कलेचे नाव नमूद केले जाणार आहे. लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. त्याआधी, लोककलेचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गुण वाढवून मिळणार आहेत.’ मनीषा साठे म्हणाल्या, ‘अभिजन आणि बहुजनांची कला अशी विभागणी करताच येणार नाही. कला सर्वजणांच्या हृदयाला भिडणारी असते.जाणकार आणि सामान्यजनांना आनंद देते तीच खरी कला. लोककला, शास्त्रीय नृत्यकलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. परंपरेची कास धरत कलेची साधना करत राहिल्यास ध्येय निश्चितपणे साध्य होते.’ शैला खांडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश खांडगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)