Pune: बालसुधारगृहात मुलासोबत केले अनैसर्गिक कृत्य, तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:08 AM2023-11-23T11:08:06+5:302023-11-23T11:09:17+5:30
भिवंडी परिसरात झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने आरोपी मुलांना येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र संचालित बालसुधारगृहात ठेवले आहे...
पुणे :येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली.
भिवंडी परिसरात झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने आरोपी मुलांना येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र संचालित बालसुधारगृहात ठेवले आहे. एका गुन्ह्यात पीडित मुलालाही याच बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. बराक क्रमांक दोनच्या परिसरात आरोपी मुलांनी पीडित मुलाला मारहाण करून कपडे धुण्यास सांगितले. मुलाने नकार दिल्यानंतर तोंडात साबण घालून त्याला कपडे धुण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी मुलांनी मध्यरात्री झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
मुलाला त्रास झाल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेली आरोपी मुले अठरा वर्षांची आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे. याबाबत न्यायालयाला पत्र देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी मुलांना अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे यांनी सांगितले.