पुणे महापालिकेच्या मदतीसाठी सधन नागरिकांचीच नोंदणी; गरजू राहताहेत वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:33 PM2020-04-14T12:33:21+5:302020-04-14T12:41:40+5:30
नित्याच्या घटनांमुळे खरे गरजवंत मात्र या मदतीपासून वंचित
- नीलेश राऊत
पुणे : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर जाणे शक्य नसलेल्या गरजू व ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग व्यक्तिंकरिता पुणे महापालिकेने गव्हाचे पीठ, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र मदत केंद्र (सेल)ची उभारणी केली. परंतू, हा सेल सध्या सदन नागरिकांकडूनच होणाऱ्या मागणीमुळे त्रस्त झाला आहे. नावनोंदणी केलेल्यानुसार व मिळालेल्या माहितीच्या आधारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास गेलेले कर्मचारी संबंधितांची आर्थिक परिस्थिती पाहून आवाक होत आहेत. यामुळे खोटी माहिती देऊन केली जाणारी मागणी सदर यंत्रणेसाठी मोठी डोकेदुखी ठरली असून, अशा नित्याच्या घटनांमुळे खरे गरजवंत मात्र या मदतीपासून वंचित राहत आहेत.
स्वयंसेवी संस्था व दानदूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या मदतीच्या आधारे, पुणे महापालिकेने शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तिंकरिता आवश्यक मदत किट (५ किलो गव्हाचे पीठ, ५ किलो तांदुळ, १ किलो डाळ, १ लिटर तेल, १ किलो मीठ,१ किलो साखर, १०० ग्रॅम हळद,२५० मसाला, १ अंगाचा व कपड्या साबण तथा आवश्यक औषधे) विनामूल्य देण्याची योजना ६ एप्रिल पासून सुरू केली. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करून गरजूंना मदत प्राप्तीसाठी मागणी नोंदविण्याचे आवाहन केले. परंतू, या कक्षात आज नित्याने दोनशे ते अडीचशे फोन येत असून, यापैकी अनेक फोन हे सदन नागरिकांचेच असल्याचे लक्षात येत आहे. किंबहुना जी माहिती दिली जाते. त्याप्रमाणे नोंदणी करून या यंत्रणेतील कर्मचारी सदर किट घेऊन संबंधिताच्या घरी गेल्यावर जे चित्र पाहतात ते वेगळेच असते़ आजपर्यंत ८० ठिकाणी हे किट घेऊन कर्मचारी गेले असता, तेथे फोन करणारी व्यक्ती ही मोठ्या घरासह आर्थिक सुबत्ता असलेली आढळून आल्याने ही मदत घेऊन गेलेले पालिकेचे कर्मचारी पुन्हा परत आले.
केवळ घरबसल्या व मोफत किट तेही फोनवर मिळत असल्याने याचा गैरफायदा घेणाऱ्यांनी आत्ता या आपत्तीच्या काळातही डोके वर काढले आहे. परंतू, सदन नागरिकांच्या या अनावश्यक मागणी व नावनोंदणीमुळे खरोखर गरजू असलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना या मदतीपासून वंचित रहावे लागत आहे.
मदत कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिलपर्यंत शहरातील ८५७ दिव्यांग व निराधार ज्येष्ठ नागरिकांना ही मदत देण्यात आली आहे. ही मदत देताना संबंधित व्यक्तीची फोनवरूनच माहिती घेतली जात आहे. या कक्षाकडे समाजातील विविध स्तरातून जशी मदत मिळत आहे तशी ती या नागरिकांमध्ये वितरित करण्यात येत आहे. याकामी पालिकेचे वार्डस्तरीय कर्मचारी जीवाची तमा न बाळगता कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागात जात आहेत. अशावेळी अनावश्यक होणाऱ्या सदन नागरिकांच्या त्रासामुळे हे कर्मचारीही आता वैतागले आहेत. परिणामी नाहक फोन करून नोंदणी करणाऱ्या नागरिकांनीही आता सामाजिक बांधिलकी जपून, गरजू व दिव्यांगांपर्यंत ही मदत पोहचेल यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे़.
--------------------
सोशल मीडियावर गेली चुकीची माहिती
पुणे महापालिकेने सदर मदत केंद्र सुरू केल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. मात्र, या माहितीत कक्षप्रमुखांचे मोबाईल क्रमांक हे अशी मदत पालिकेला देऊ करणाऱ्या संस्था व व्यक्तींसाठी होता. परंतू मदत करणाऱ्यांपेक्षा अधिकचे फोन हे मदत मागणाऱ्यांचेच या क्रमांकावर अधिक येत आहेत. परिणामी मदत देऊ करणारे पालिकेच्या यंत्रणेपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे गरजू व्यक्तींनी पालिकेच्या मदत कक्षाचा क्रमांक ०२०-२५५०१२८५ वरच संपर्क साधावा.
पालिकेला मिळालेल्या मदतीतून ही मदत गरजूंना दिली जात असल्याने अधिकाधिक सामाजिक संस्थांनी तसेच नागरिकांनी पालिकेच्या या कार्यास हातभार लावावा व या जीवनाश्यक वस्तू पालिकेच्या कक्षात द्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
-----------