रेमडेसिविरचा अनावश्वयक वापर घातक,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:12+5:302021-05-01T04:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनच्या अनावश्यक वापरामुळे कोरोना बाधितांवर साईड इफेक्ट ही मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनच्या अनावश्यक वापरामुळे कोरोना बाधितांवर साईड इफेक्ट ही मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ लागले आहेत. किडनी व लिव्हरला आघात होत असून, रुग्णाची शुगर पातळी ही वाढत आहे. त्यामुळे रुग्णाची आरोग्य परिस्थिती पाहून व या इंजेक्शन वापराचे नियम पाळून ते गरजेनुसारच दिले गेले पहिजे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम पाहण्यास मिळू शकतात, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शन आपल्या रुग्णाला मिळाले नाही तर आपला रुग्ण दगावेल. अशी भीती निर्माण झाल्याने कोरोनाबधितांचे नातेवाईक आज हे इंजेक्शन मिळविण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु, हे इंजेक्शन लाईफ सेविंग ड्रग नसल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तर या इंजेक्शनची काहीच आवश्यकता नाही. मध्यम व तीव्र स्वरूपाच्या लक्षणांमध्ये प्रारंभीच्या १२ दिवसात व तो रुग्ण ऑक्सिजनवर असेल तरच ते वापरले गेले पाहिजे.
कोट
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शन हेच सर्व काही आहे, हा समज अत्यंत चुकीचा आहे. या इंजेक्शनकडे ''लाईफ सेविंग ड्रग'' म्हणून पाहू नये. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून आजही या इंजेक्शन शिवाय दिवसाला ५० हून अधिक रुग्ण पूर्णतः बरे होऊन बाहेर पडत आहे. ''एबोला'' नावाच्या आजारात आफ्रिकेमध्ये हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात वापरले जातो. कोरोना आजारात याचा सौम्य डोस तो ही आवश्यकतेनुसार दिला जात आहे. याच्या वापरामुळे केवळ कोरोनाबाधित रुग्णाला लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. हे इंजेक्शन योग्य वेळी व त्याच्या नियमानुसार वापरले तर ते पूर्ण सुरक्षित आहे. रेमडेसिविर इंजेक्शन हे काही कोरोनाबाधित रुग्णांसाठी ''लाईफ सेविंग ड्रग'' नाही.
-डॉ. भारत पुरंदरे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल.
-------
रेमडेसिविर इंजेक्शन हे कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक औषध नसून, या इंजेक्शनची परिमाणकता त्याचा वापर योग्य वेळी व योग्य प्रमाणातच झाला तरच काही ठराविक कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिसून येतो. हे इंजेक्शन म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांसाठी संजीवनी नाही. या इंजेक्शनचा वापर केवळ काही प्रमाणात ''व्हायरल इन्फेक्शन'' कमी करण्यासाठी होतो. रेमडेसिविर इंजेक्शनचा रुग्णांमधील अनावश्यक वापर हा संबंधित रुग्णाच्या लिव्हर, किडनीवर घातक परिणाम करणारा आहे.
डॉ. संजीव वावरे, साथरोग आजार नियंत्रण अधिकारी, तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महापालिका