अनधिकृत राजकीय फलक झळकताहेत
By admin | Published: January 13, 2017 03:14 AM2017-01-13T03:14:30+5:302017-01-13T03:14:30+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली असली, तरी शहरातील प्रमुख चौक, रस्त्यावरील
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली असली, तरी शहरातील प्रमुख चौक, रस्त्यावरील राजकीय फलक, पदाधिकाऱ्यांचे नामफलक, राजकीय पक्षांचे फलक जसेच्या तसेच गुरुवारी दिसून आले. अशा पध्दतीने राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून निवडणूक आचारसंहितेची ऐशीतैशी सुरू असल्याचे दिसून आले. अखेर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अनधिकृत राजकीय फलकांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता जारी झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने नियोजन केले आहे. महापालिका २० पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेतली आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी फलक उभारले होते. आता लक्ष्य २०१७ असे फलक उभारले होते.
सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि इच्छुकांनी फ्लेक्सबाजी सुरू केली होती. त्याचबरोबर नववर्षाचे फलकही इच्छुकांनी उभारले आहेत. आचारसंहिता जारी झाली असली तरी सर्वच प्रभागांमध्ये राजकीय फलक काढण्याची मोहीम प्रशासनाने तीव्र केलेली नाही.
अ,ब,क,ड,ई आणि फ या प्रभागातील विविध सोसायट्या, रस्त्यावर फलक दिसून येत आहे. पिंपळे गुरव येथील महापौर शकुंतला धराडे यांच्या निवासस्थानाकडे जाणारा फलक झाकलेला आहे. मात्र, अन्य पदाधिकाऱ्यांचे फलक रस्त्यावर दिसून येत आहेत. यासंदर्भात निवडणूक विभागाकडे तक्रारी झाल्यानंतर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यावर झळकताहेत अनधिकृत जाहिराती
निवडणूक असल्याचे प्रभागामध्ये लहान फ्लेक्सला पीक आले आहे. इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स उभारले आहेत. तसेच रस्त्याच्या दुभाजकावरील विद्युत खांबांना मोठ्या प्रमाणावर फलक लावण्यात आलेले आहेत. अनधिकृत फलकांकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे आचारसंहितेची ऐशीतैशी सुरू असल्याचे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.
राजकीय नेत्यांच्या वाहनांवरील स्टिकर ‘जैसे थे’
महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने तसेच इच्छुक, नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवरील मागील काचेवर लक्ष्य २०१७ असे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर मात्र निवडणूक विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
मोटारी रंगल्या प्रचाराच्या ‘स्टिकर’नी
पिंपरी : वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असून, वाहतूक नियमांच्या जनजागृतीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत मोटारींच्या काचांवर सर्रासपणे इच्छुकांचे मोठ्या आकाराचे स्टिकर चिकटविलेले असताना त्याकडे मात्र डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेची निवडणूक २१ फेबु्रवारीला होत असून, राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. इच्छुकांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारांच्या भेटीगाठी, इच्छुकांच्या नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखती, पक्षप्रवेश, उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड असे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. राजकीय पक्षांनीही जोरदार ताकत लावली आहे.
इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात असून, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोटारींवरील काचेवर स्टिकर चिकटविले आहेत. त्यावर इच्छुकांच्या फोटोसह पक्षाचे चिन्ह, महापालिका इमारतीचा फोटो, ‘लक्ष्य २०१७’ असा मजकूर दिसून येत आहे. एकीकडे काळ्या काचांवर कारवाई करीत दंड आकारणाऱ्या पोलिसांकडून मात्र स्टिकर चिकटविलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. एरवी इतर वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जाते. दंड वसूल केला जातो. मात्र, राजकीय नेत्यांचे स्टिकर लावून शहरभर फिरणारया वाहनांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे.(प्रतिनिधी)