Chinchwad Vidhan Sabha 2024: चिंचवड, उपनगरात मतदानाचा अपूर्व उत्साह; गोंधळ न होता शांततेत मतदान पार

By विश्वास मोरे | Updated: November 20, 2024 20:25 IST2024-11-20T20:25:23+5:302024-11-20T20:25:42+5:30

सायंकाळी साडेपाचपर्यंत ५५.४ टक्के मतदान झाले असून २१ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद

Unprecedented Voting Enthusiasm in Chinchwad Suburbs Vote peacefully without confusion | Chinchwad Vidhan Sabha 2024: चिंचवड, उपनगरात मतदानाचा अपूर्व उत्साह; गोंधळ न होता शांततेत मतदान पार

Chinchwad Vidhan Sabha 2024: चिंचवड, उपनगरात मतदानाचा अपूर्व उत्साह; गोंधळ न होता शांततेत मतदान पार

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघांतील गावठाणे, उपनगरात आज मतदानाचा अपूर्व उत्साह दिसून आला. सायंकाळी साडेपाचपर्यंत ५५.४  टक्के मतदान झाले असून २१ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कोणताही गोंधळ न होता, शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानात वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये भाजपचे उमेदवार शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर, मारुती भापकर रिंगणात आहेत.

यांनी केले मतदान 

पिंपळे गुरव येथील शाळेमध्ये शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, ऐश्वर्या रेणुसे, आदित्य जगताप यांनी मतदान केले.  त्याचबरोबर वाकड येथील शाळेमध्ये राहुल कलाटे, कमल कलाटे, वृषाली कलाटे, सावेरी कलाटे, सोनाली कस्पटे, दीपाली कलाटे यांनी मतदान मतदान केले. भाऊसाहेब भोईर यांनी भोईरनगर येथील मतदान केंद्रावर, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सारिका प्रताप आणि विश्वजीत बारणे यांनी थेरगाव येथील मतदान केंद्र मतदान केले. पद्मश्री मुरलीकांत पेटकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवडला मतदान केले.

असा वाढत गेला उत्साह 

चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरामध्ये सकाळी सातपासून पहिल्या टप्प्यामध्ये कामगारांचा उत्साह चांगला होता. कामगार वर्ग हा सोसायटीतील मतदार बाहेर पडले. रावेतमध्ये दुपारी ११ नंतर मोठ्या प्रमाणावर उत्साह गर्दी दिसून आली. मतदान केंद्राबाहेर असणाऱ्या सेल्फी पॉईंटवर छायाचित्र घेण्यासाठी गर्दी झाली होती. चिंचवडगावात दुपारी दोनच्या सुमारास गर्दी झाली होती. दुपारी एक ते तीन या वेळेमध्ये उत्साह कमी होता. आज उन्हाची तीव्रता फारशी नव्हती. केंद्रावरील गर्दी कमी होती. सायंकाळी चारनंतर सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, थेरगाव आणि पिंपळे निलख या परिसरातील मतदार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. सायंकाळच्या साडेचार ते सहा या टप्य्यात महिला मतदारांची गर्दी दिसून आली. पिंपळे गुरव, थेरगाव, चिंचवड आणि वाकडमधील झोडपट्यामधील मतदार बाहेर पडला. केंद्रांवरही गर्दी दिसून आली.

कडेकोट बंदोबस्त आणि वाहतुकीचे नियोजन 

मतदान केंद्राबाहेरील १०० मीटरच्या आवारामध्ये वाहनांना प्रतिबंधक केला होता. बॅरिकेट लावले होते. त्यामुळे अनेक भागातील मुख्य रस्ते बंद केले होते. त्यापरिसरात राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती. मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मोबाईल कोठे ठेवायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता.

Web Title: Unprecedented Voting Enthusiasm in Chinchwad Suburbs Vote peacefully without confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.