रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:12+5:302021-05-12T04:10:12+5:30
कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले असल्याने कुरकुंभ ...
कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले असल्याने कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रकल्पातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असून महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर आपली हतबलता दर्शवली आहे. तर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे दूषित पाणी आमचे नाही असं सांगून हात झटकत आहे. तसेच रस्ते विकास महामंडळाने देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्या या प्रदूषित पाण्याला कोणीच वाली नसल्याने या समस्येमुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा विषय गेली दोन दशकांपासून प्रलंबित असून, याबाबत आजवर अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. मात्र या सर्व बैठका उद्योजकधार्जिण्या असल्याचे दिसून आले आहे. विविध स्तरांवर आदेश मिळूनदेखील उद्योजक या आदेशांना भीक न घालता राजरोसपणे दूषित पाणी उघड्यावर सोडून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. आत्तापर्यंत जमिनीत मुरणारे व ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून वाहणारे दूषित पाणी आता थेट कुरकुंभकरांच्या दारात पोहोचणार आहे. याबाबत कोणताच पदाधिकारी बोलण्यास तयार नसून त्यामुळे उद्योजकांचे फोफावत आहे.
दरम्यान, सुरुवातीला याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे यांनी या पाण्याचा नमुना तपासणीसाठी घेतला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाण्याची पाइपलाइन लिकेज असल्याचा दावा केला आहे तर औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी विजय पेटकर यांनी हा दावा खोटा असून, पाण्याच्या लाईन लिकेज नाहीत, मात्र प्रदूषण मंडळ आपली जबाबदारी झटकून दुसऱ्यांवर आरोप करीत आहेत असे सांगितले आहे. तसेच ज्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरातून हे दूषित पाणी सर्रासपणे बाहेर येत आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी आमचे नसून उलट आम्हीच हे पाणी कोणाचे हे शोधून काढण्यासाठी प्रदूषण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळ यांना पत्र लिहिले असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र याबाबत लवकरच उपाययोजना करणार असल्याचे पेटकर यांनी मान्य केले आहे.
पोलिसांनी हस्तक्षेप करावा____एरवी उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून बैठका आयोजित केल्या जातात. उद्योजकांना उद्योगात येणाऱ्या स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी सर्रास पोलीस बळाचा वापर देखील केला जातो. मात्र उद्योजकांकडून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या जिवाशी होणारा खेळ व त्यांच्या तक्रारी कोणीच ऐकून घेत नसल्याच्या अडचणीला कोणीच सोडवताना दिसून येत नसल्याने कायदा व सुरक्षेच्या रक्षणकर्त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थ करीत आहेत.