छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल अप्रकाशित पत्र प्रकाशझोतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 04:25 PM2018-06-22T16:25:11+5:302018-06-22T16:25:11+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेले अस्सल अप्रकाशित पत्र प्रकाशझोतात आले असून इतिहास अभ्यासक घनश्याम डहाणे यांनी त्याचा अनुवाद केला आहे.
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेले अस्सल अप्रकाशित पत्र प्रकाशझोतात आले असून इतिहास अभ्यासक घनश्याम डहाणे यांनी त्याचा अनुवाद केला आहे. याबाबत ढाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र आढळले आहे. पाली भाषेतील या पत्रात वरच्या बाजूला मंगलाकार ही शिवकालीन खूण आढळली असून त्याखेरीज पत्रात शिवकालीन धाटणीचा मजकूर लिहिलेला आहे.
या पत्राच्या मागील बाजूस मुस्लिम कालगणनेप्रमाणे तारीख लिहिलेली आहे. त्यानुसार 2 फेब्रुवारी 1674 रोजी पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. सुमारे 344 वर्ष जुनं असलेल्या या पत्राच्या शाईचा दर्जा आजही व्यवस्थित टिकून आहे. रायगडावरून पाली येथे पाठवलेले हे पत्र राज्याभिषेकाच्या पाच महिने आधीचे आहे.
महाराजांनी नागोजी पाटील कालभार (आताचे काळभोर) यांना लिहिले आहे. पाली गावचे पाटील असणाऱ्या कालभार यांची पाटीलकी खराडे पाटील हिराणून घेत होते. त्याविषयावर महाराजांनी कालभार पाटील यांना अभयपत्र किंवा कौलनामा लिहिला आहे. याबाबत माहिती देताना डहाणे यांनी महाराजांची एकूण 273 पत्रं प्रकाशित असून त्यापैकी 103 स्थायी स्वरूपात उपलब्ध असल्याचे सांगितले.