उलगडले ‘माझे जीवनगाणे’
By admin | Published: January 2, 2017 02:30 AM2017-01-02T02:30:28+5:302017-01-02T02:30:28+5:30
‘माझे जीवनगाणे’ या सांगीतिक मैफलीतून कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. पाडगावकरांच्या गाणी आणि कवितांनी रसिकांना जणू सुरेल मेजवानीच मिळाली
पुणे : ‘माझे जीवनगाणे’ या सांगीतिक मैफलीतून कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. पाडगावकरांच्या गाणी आणि कवितांनी रसिकांना जणू सुरेल मेजवानीच मिळाली. त्यांच्या कविता, त्यातील आशय, गर्भितार्थ हा प्रत्येक गाण्यातून रसिकांच्या हृदयापर्यंत झिरपत गेला.
निमित्त होते मंगेश पाडगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित मैफलीचे! अपर्णा संत, अभिषेक मारोटकर यांनी सुमधुर आवाजातून ही गायन मैफल सजवली. पाडगावकर एका कवितेत म्हणतात, ‘समूहात बसून गाणी ऐकावीशी वाटली तर त्यात काय चूक आहे? शब्दांचे नाद रूप असे मिळून भोगणे ही प्रत्येकाची अटळ भूक आहे,’ असे या वेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी’ या गाण्याने करण्यात आली. तबलावादन राजेंद्र हरकर, तालवाद्ये अभय इंगळे, केदार परांजपे (सिंथेसायझर), पराग माटेगावकर (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.
सुप्रसिद्ध चित्रकार सुरेश बापट, गिरीश इनामदार आदी उपस्थित होते. शैला मुकुंद आणि प्रकाश भोंडे यांनी सूत्रसंचालन केले. दर्पण कलादालनाचे संचालक गिरीश इनामदार यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त सत्कार करण्यात आला.
(प्रतिनिधी)