भ्रामक कल्पनांमुळे अशांतता
By admin | Published: September 1, 2016 01:58 AM2016-09-01T01:58:42+5:302016-09-01T01:58:42+5:30
जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली
पुणे : जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली आणि शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला ओढ वाटू लागल्यामुळेच ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्यावर आधारित साहित्यकृतींचा खप वाढत असल्याचे निरीक्षण प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांनी नोंदविले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते युगंधर सन्मान बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी ‘आधुनिक युगातही ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित साहित्यकृतीकडे वाचकांचा ओढा जास्त का आहे?’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जयराम देसाई उपस्थित होते.
राजेंद्र खेर म्हणाले, ‘‘जागतिकीकरणाच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माणूस पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावत राहिला. त्यामुळे शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला गरज वाटू लागली आहे. अध्यात्म्य, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांकडे समाज ओढला गेला आहे. आज प्राचीन विषय इंग्रजी साहित्यातही खपाचे ठरत आहेत. उत्क्रांतीइतकेच अपक्रांतीचे आकर्षण वाढत आहे. त्या भूमिकेतूनही या साहित्याचा वाचकवर्ग वाढतो आहे. शाश्वत मूल्यांकडे जाण्यासाठी बुद्धिनिष्ठा आणि भावही निर्माण झाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘ सावंतांचा उल्लेख ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून केला जातो; पण त्यांची लेखणी पुराण, इतिहास आणि वर्तमान अशा तिन्ही काळांना स्पर्श करणारी होती.’’ वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.