पुण्यातील रस्त्यांवर अशास्त्रीय गतिरोधकांचा भडिमार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 01:11 PM2018-11-30T13:11:02+5:302018-11-30T16:55:16+5:30
रस्त्यांवरील वाहनांचा वेग कमी करणे, हा गतिरोधकांचा मुख्य उद्देश असतो.
पुणे : शहरातील बहुतेक रस्त्यांवर अशास्त्रीय गतिरोधकांचा भडिमार करण्यात आला असल्याचे लोकमत पाहणीत आढळून आले. इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) च्या गतिरोधकाबाबतच्या निकषांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच अनेक गतिरोधकांची स्थितीही चांगली नाही. त्यामुळे वाहनांची गती कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यात गटारांच्या झाकणांमुळे तयार झालेल्या ‘कृत्रिम गतिरोधकां’ची भर पडली आहे.
रस्त्यांवरील वाहनांचा वेग कमी करणे, हा गतिरोधकांचा मुख्य उद्देश असतो. ‘आयआरसी’च्या निकषानुसार गतिरोधकांची उंची ०.१० मीटर तर रुंदी ३.७ मीटर असणे अपेक्षित आहे. तसेच गतिरोधकाच्या दोन्ही बाजुला काळे-पांढरे पट्टे असायला हवेत. पण शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर हे निकष पायदळी तुडविले गेले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने शहरातील विविध रस्त्यांवर पाहणी केली. सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सिंहगड रस्ता, गणेशखिंड रस्ता, सातारा रस्ता, नेहरू रस्ता या रस्त्यांवर गतिरोधकांची स्थिती पाहण्यात आली.
शहरातील अनेक ठिकाणी गतिरोधकांची उभारणी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. काही ठिकाणचे गतीरोधक हे खुपच छोटे आहेत. तर काही ठिकाणचे खुपच मोठे आहेत. प्रत्येक गतिरोधकाचा आकार हा वेग वेगळा आहे. प्रत्येकाची लांबी, उंचीमध्ये फरक आहे. त्यामुळे चालकांना विशेषता: दुचाकी स्वारांना गाडी चालवताना त्रास होतो. गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेन्ट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहनचालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचना फलकही रस्त्यावर असणे अपेक्षित आहे. पण या बाबींकडे बहुतेक रस्त्यांवर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गतिरोधकांना न जुमानता वाहनचालक सुसाट वाहन दमदाटी असल्याचे आढळले.
................
उंची-लांबीचे निकष पायदळी
‘आयआरसी’च्या निकषानुसार शहरातील बहुतेक रस्त्यांवरील गतिरोधकांची उंची व लांबी आढळून आली नाही. एकाच रस्त्यावरवेगवेगळ्या आकाराचे गतिरोधक आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये या गतिरोधकांचा विचारच केला गेलेला नाही. त्यामुळे काही गतिरोधक डांबरीकरणात जणू गायब झाले आहेत. अनेक गतिरोधकांवर खड्डे पडले आहेत.
----------------
फलक नाहीत
रस्त्यावर गतिरोधक असल्याची माहिती देणारे फलक किमान ४० मीटर अंतरावर असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक रस्त्यांवर असे फलक आढळून आले नाहीत. वेगात असलेल्या चालकांना काही अंतर आधीच गतिरोधकाची माहिती मिळावी, हा या फलकाचा उद्देश असतो. पण गतिरोधक तयार करताना या फलकांकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
---------------
पांढरे पट्टे गायब
नियमानुसार गतिरोधकाच्या दोन्ही बाजुला पांढरे पट्टे काढणे आवश्यक असते. वेगात असलेल्या वाहनचालकांना या पट्ट्यांमुळे गतिरोधक दिसून येतात. पण अनेक गतिरोधकांवरील हे पट्टे धुसर झाले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरणामध्ये हे पट्टेही गायब झाल्याचे दिसून आले.
-------------
विधी महाविद्यालय रस्ता- अभिनव चौक ते बालभारती चौकपर्यंत
- एकूण २ गतीरोधक
- पांढरे पट्टे पुसले गेलेले
- डांबरीकरणामुळे गतीरोधकाची उंची डांबरीकरण केल्यानंतर खूपच कमी झालेली दिसली.
-----------------
सेनापती बापट रस्ता-
ह्या रस्त्यावर एकही गतिरोधक आढळले नाही. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पुसले गेले आहेत. गटारांच्या झाकणांमुळे काही ठिकाणी कृत्रिम गतिरोधक तयार झाले आहेत.
----------
गणेश खिंड रस्ता -
१ गतिरोधक, पांढरे पट्टे गायब,काही ठिकाणी खड्डे पडले आहेत.
--------------
जंगलीमहाराज रस्ता-
२ गतिरोधक
संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या ड्रेनेज वरच गतिरोधक, दोनही गतिरोधक सुस्थितीत. उंची जास्त.
----------------
फर्ग्युसन रस्ता-
गतिरोधक, गतिरोधकांवरील पांढरे पट्टे गेलेले, गतिरोधकांची उंची काही ठिकाणी कमी-अधिक.
-------------------