बेशिस्त वसाहतींमुळे शहर होतेय बेढब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:51+5:302020-12-27T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या कक्षा गेल्या वीस वर्षात प्रचंड वेगाने विस्तारल्या आहेत. चोहोबाजुंनी उपनगरांसह ग्रामीण हद्दीत नव्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या कक्षा गेल्या वीस वर्षात प्रचंड वेगाने विस्तारल्या आहेत. चोहोबाजुंनी उपनगरांसह ग्रामीण हद्दीत नव्याने वसाहती निर्माण झाल्या आहेत. गुंठेवारीत बांधलेल्या अनधिकृत इमारतींमुळे बकालपणा येऊ लागला आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे शहराचा व्यास बेढब झाला असून पाणी, वीज, ड्रेनेज, आरोग्य आदी पायाभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
नुकतेच पालिकेच्या हद्दीमध्ये २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तर, यापुर्वी ११ गावे २०१७ साली समाविष्ट करण्यात आली. तर पूर्वीपासूनच्या कात्रज, आंबेगाव, वारजे, धायरी, सिंहगड रस्ता, बावधन, बाणेर, औंध, खराडी, चंदननगर, मुंढवा, कोंढवा, हडपसर, वानवडी या उपनगरांमध्ये रोजगारासााठी आलेल्या नागरिकांच्या वसाहती आहेत. आयटी कंपन्या आल्यानंतर बांधकामे वाढली.
पालिका प्रशासनाने उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले. तर, शहराच्या हद्दीत समावेश होण्यापुर्वीच सीमेवरील गावांमध्येही ‘ग्रामपंचायत सँक्शन’चा सपाटा लावला. ना प्रशस्त रस्ते ना नागरी सुविधा अशी काहीशी स्थिती या भागांमध्ये पहायला मिळते आहे.
====
वसाहती म्हणजे समस्यांचे माहेरघर
पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते आणि वीजेचा मोठा प्रश्न आहे. या नागरी सुविधांसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. रस्ते अरुंद त्यातच खड्डेही बुजविले जात नाहीत. जागोजाग तुंबलेली गटारे रस्त्यावर वाहतात. आरोग्य केंद्रे नाहीत. पिण्याचे पाणी काही भागांना दिवसाआड तर काही भागात तीन-चार दिवसांनी येते.
====
पुणे शहराची एकूण लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येपैकी साधारणपणे ३० टक्के लोकसंख्या उपनगरांमध्ये राहते. नव्याने समाविष्ट होणा-या गावांमधील लोकसंख्याही आता वाढणार आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर ताण येणार आहे.
===
या आहेत प्रमुख समस्या
अ. रस्त्यांवर जागोजाग पडलेले खड्डे, अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमणे.
ब. पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, टँकरवर रहावे लागते अवलंबून.
क. नियोजनाच्या अभावामुळे वाढलेली अनधिकृत बांधकामे.
ड. आरोग्याच्या सुविधांचा अभाव.
चौकट
“आम्ही गेली तीन वर्षे धायरीमध्ये राहतो. अवघ्या तीन गुंठ्यात बांधलेल्या इमारतीत स्वस्तात मिळाले म्हणून आम्ही घर घेतले. परंतु, आम्हाला पाणी आणि रस्त्याची प्रमुख समस्या आहे. यासोबतच आता पालिकेचे विविध कर भरावे लागणार असल्याने घाम फुटला आहे. या भागात सुविधांची वानवा आहे. रस्त्यांची अवस्था पाहिली तर आपण शहरात राहतोय की गावात हेच समजत नाही.”
- अर्जून जाधव, वडगाव धायरी
चौकट
“प्रत्येक निवडणुकीत नगरसेवक रस्ते होणार, नागरी सुविधा देणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हक्काचे पाणी मिळणार अशी स्वप्ने दाखवितात. परंतु, आम्हाला अद्यापही पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नाही. याबाबत वारंवार तक्रारी करुनही त्याचे निराकरण केले जात नाही.”
- विशाल नाडकर्णी, वडगाव शेरी