Maharashtra | राज्यात सोमवारनंतर पुन्हा अवकाळीचे संकट; हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 09:03 PM2023-03-10T21:03:51+5:302023-03-10T21:05:53+5:30
दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता...
पुणे : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येऊ घातले असून, सोमवारनंतर (दि. १३) राज्याच्या उत्तर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतरचे दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असून १६ व १७ मार्चला संबंध राज्यात मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य भागात सोमवारनंतर पश्चिमी चक्रावाताची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे द्रोणीय रेषा तयार होण्याचा अंदाज आहे. परिणामी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जमिनीवर आर्द्रता वाहून आणली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
डॉ. काश्यपी म्हणाले, “रविवारनंतर ढगाळ स्थिती तयार होणार आहे. त्यामुळे सोमवारी व मंगळवारी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत अंशत: ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचीही शक्यता आहे. मात्र, पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल. त्यानंतर गुरुवारी ढगांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १६ व १७ मार्चला मेघगर्जनेसह व सोसाट्याच्या वाऱ्यासह संबंध राज्यात पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे.”
या दोन दिवसांत राज्यभर पावसाचा अंदाज असून त्यानंतर १८ मार्चपासून कोकणात वातावरणात सुधारणा होईल. विदर्भात मात्र, काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता कायम राहील. त्यानंतर हा कमी दाबाचा पट्टा ओडिशा, तेलंगणा राज्यांत सरकेल, असेही काश्यपी यांनी सांगितले.
पुण्यातही ढगाळ वातावरण
याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १६ व १७ मार्चला सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटांची शक्यता आहे. वातावरण सध्या कोरडे असल्याने सोासाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठतील, झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डाॅ. काश्यपी यांनी केले आहे.