अवकाळी पावसाचा पुण्यातील ७ तालुक्यांना फटका; पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 10:47 AM2023-03-09T10:47:05+5:302023-03-09T10:47:14+5:30
हवामान विभागाने पुढील २ दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता
पुणे: जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सात तालुक्यांना बसला आहे. त्यामुळे ४४.३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील दोन गावांत द्राक्ष, कांदा, गहू आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील २० गावांमधील शेतीचे नुकसान झाले आहे. या २० गावांतील ३८.५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने गहू, आंबा आणि भाजीपाला यांचा समावेश आहे.
हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरुर या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. हवेलीमध्ये ०.८०, मुळशीमध्ये १.१७, मावळमध्ये ८.७३, जुन्नरमध्ये ६, खेडमध्ये ४, व शिरुरमध्ये ०.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात नुकसान झाल्याचा हा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना नुकसानीची माहिती देण्यासाठी तातडीने अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.