सीएमडीं’चा अस्थिर झुला
By admin | Published: April 12, 2015 12:26 AM2015-04-12T00:26:26+5:302015-04-12T00:26:26+5:30
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही.
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही. या काळात पीएमपीची धुरा खांद्यावर असलेले तब्बल १२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पुणेकरांनी पाहिले. कधी एक दिवस तर कधी चार महिन्यांसाठी भार खांद्यावर घेतलेल्या ‘सीएमडीं’चा अस्थिर झुला पीएमपीच्या सुधारणांना लटकवणारा ठरला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकांची स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक सेवा २००७ मध्ये एकत्र करून ‘पीएमपी’ ही कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनी तयार करताना कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद निर्माण करण्यात आले. या पदावर ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी नेमण्याचे निश्चित केले. त्यानुसार १९ आॅगस्ट २००७ रोजी सुब्बराव पाटील यांच्या रूपाने ‘पीएमपी’ला पहिले सीएमडी मिळाले. पाटील यांना काम करण्यासाठी सुमारे १३ महिन्यांचाच कालावधी मिळाला. मात्र, या काळातही त्यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यानंतर अश्वनीकुमार यांच्यावर केवळ एकच दिवस हा भार सोपविण्यात आला. त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा पाटील यांना दीड महिन्याची तर त्यानंतर पुन्हा अश्वनीकुमार यांना तीन महिन्यांसाठी संधी देण्यात आली.
‘सीएमडी’ बदलाची ही मोहीम राज्य शासनाने पुढेही नित्यनेमाने सुरूच ठेवली. मागील आठ वर्षांत तब्बल १२ अधिकारी बदलण्यात आले. खाडे यांच्यानंतर आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता सीएमडी म्हणून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर हा भार अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला. त्यांच्याकडे इतर विभागांची मुख्य जबाबदारी होती. त्यामध्ये महेश झगडे, शिरीष कारले, दिलीप बंड, राजीव जाधव, डॉ. श्रीकर परदेशी आणि काही दिवसांपूर्वीच आलेले ओमप्रकाश बकोरिया या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ जोशी यांनीच पूर्ण तीन वर्षे पीएमपी सांभाळली. मात्र, सुरुवातीपासून टप्प्याटप्याने नवीन अधिकारी मिळत गेल्याने पीएमपीच्या दुर्दशेला सुरुवात झाली. मागील दोन-तीन वर्षांत तर पीएमपीला जणू उतरती कळा लागली आहे.
आतापर्यंत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सुब्बराव पाटील (१९ आॅगस्ट २००७ ते २१ सप्टेंबर २००८), अश्वनीकुमार (२२ सप्टेंबर २००८ (एकच दिवस), सुब्बराव पाटील (२३ सप्टेबिंर ते ५ नोव्हेंबर २००८), अश्वनीकुमार (५ नोव्हेंबर २००८ ते ५ फेबु्रवारी २००९), नितीन खाडे (९ फेबु्रवारी ते २५ आॅगस्ट २००९), महेश झगडे (२५ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर २००९ (अतिरिक्त पदभार), शिरीष कारले (७ सप्टेंबर २००९ ते २३ फेबु्रवारी २०१० (अतिरिक्त पदभार), दिलीप बंड (२३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११ (अतिरिक्त पदभार), आर. एन. जोशी (३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४), राजीव जाधव (१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१४ (अतिरिक्त पदभार), डॉ. श्रीकर परदेशी (१४ डिसेंबर २०१४ ते ४ एप्रिल २०१५ (अतिरिक्त पदभार)