लस म्हणजे अमृत नव्हे; स्वयंशिस्त पाळणे आवश्यक : आरोग्यमंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 01:08 PM2020-12-05T13:08:41+5:302020-12-05T13:26:15+5:30

कोरोना आटोक्यात आणण्याचे खरे श्रेय डॉक्टरांना 

Until the corona is vaccinated, I am my protector: Health Minister Rajesh Tope | लस म्हणजे अमृत नव्हे; स्वयंशिस्त पाळणे आवश्यक : आरोग्यमंत्री राजेश टोपे

लस म्हणजे अमृत नव्हे; स्वयंशिस्त पाळणे आवश्यक : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे डॉक्टरांचा सन्मान पत्रकारांना विमा कवच मिळण्यासाठी प्रयत्न करणार

पुणे : कोरोनावरील लस कधी येईल हे आज सांगणे शक्य नाही. पण केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लसीकरणाचा क्रम ठरविला जाणार आहे. लस हे अमृत नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे अपेक्षित असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. 

कोरोना साथीने थैमान घातलेले असताना आपल्या जीवाची पर्वा न करता सलग आठ महिन्यांपासून अधिक काळ रुग्णसेवेत झोकून देणार्‍या महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक-पत्रकारांचा सन्मान शुक्रवारी (दि.4 ) आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रोहित पवार, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, लोहिया परिवार ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहिया, प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे अध्यक्ष नितीन बिबवे व्यासपीठावर होते. कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व यावेळी स्वीकारण्यात आले.

टोपे म्हणाले, कोरोना झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६०० दिवसांपर्यंत गेले आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्याचे खरे श्रेय डॉक्टरी सेवा देणार्‍या कोरोना योद्ध्यांचे आहे. मानवतेचे रक्षण करण्याचे काम डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांमध्येच देवाचे दर्शन झाले आहे. या देवदूतांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केला हा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. कोरोना काळात अनेक हात पुढे आले. सेवा देण्याचे हेे काम मानवतेच्या दृष्टीने झाले आहे.

कोरोनाकाळात काम करणाऱ्या पत्रकारांना विमा कवच मिळालेच पाहिजे यासाठी मीही आग्रही असून पत्रकारांसाठी सरकार दरबारी मी कायम वकिली करीत राहीन अशी ग्वाही टोपे यांनी दिली.

रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कोरोना काळात अनेकांनी लढा दिला. या कोरोना वॉरिअर्सना शोधून काढून त्यांचा सत्कार केला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पत्रकारांनीही सकारात्मक बातम्या देऊन डॉक्टर, कर्मचारी तसेच या काळात मोलाचे योगदान देणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे मनोधैर्य वाढविण्यास मदत केली. 

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले कार्य अतुलनिय आहे. कोरोना संकटाविषयी काळजी कशी घ्यावी याची कुणालाही माहिती नव्हती. अशा परिस्थितीत प्रत्येक आघाडीवर डॉक्टर लढले, सेवा केली. या काळात पत्रकारांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बिबवे यांनी केले. पंकज बिबवे यांनी आभार मानले.
-=

Web Title: Until the corona is vaccinated, I am my protector: Health Minister Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.