पुण्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:05+5:302021-03-22T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारपट्टी, गोवामार्ग उत्तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारपट्टी, गोवामार्ग उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस राज्यातील कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने २४ मार्च रोजी गारपीट आणि वादळी वार्यासह पावसाचा जोर अधिक असल्याची शक्यता आहे.
राज्यात रविवारी सकाळपर्यंत विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. बुलढाणा १७, वर्धा ८.६, नागपूर३.९, वाशीम ८.६, यवतमाळ ८, परभणी १०, अकोला ५.८, सोलापूर ०.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.
विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाी पाऊस पडला. कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने कोकणात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, साेलापूर या जिल्ह्यात २२ ते २४ मार्च असे तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जाल्ना, बीड जिल्ह्यात २२ व २३ मार्च रोजी तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यात २२ ते २४ मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे. २४ मार्च रोजी वादळी वार्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे.