अवकाळी पावसाचा १८ जिल्ह्यांतील शेतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:44+5:302021-03-26T04:12:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८० तालुक्यांमधील ६५ हजार हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. कृषी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८० तालुक्यांमधील ६५ हजार हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाचा हा प्राथमिक अहवाल आहे.
रब्बीच्या हंगामातील पिके काढणीला आली असतानाच हा अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पिके काढून उघड्यावरच ठेवली होती. अचानक झालेल्या पावसात ती भिजली व खराब झाली. एकूण ६५ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने झोडपले.
त्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, नाशिक, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गहू, बाजरी, कांदा,मका तसेच भाजीपालाही या पावसात सापडला.
महसूल व कृषी विभागाच्या वतीने नुकसान झालेल्या ठिकाणांचे रीतसर पंचनामे करण्यात येत आहेत. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरकारच्या वतीने २ हेक्टरची नुकसानभरपाई देण्यात येते.