Heavy Rain: राज्यात अवकाळी पावसाने 'साडेतीन हजार' तर पुण्यात 'दोन हजारांहून' अधिक जनावरे दगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 08:36 PM2021-12-03T20:36:35+5:302021-12-03T20:36:49+5:30
राज्यातील रायगड अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली
पुणे : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने ५ जिल्ह्यांमधील २९ तालुके व १९९ गावे ग्रस्त झाली. तिथे ३ हजार ५०० पेक्षा जास्त शेळ्यामेंढ्या पावसात भिजल्याने थंडीने गारठून मरण पावल्या आहेत. त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात पाऊस व थंडीने तब्बल 2 हजार 133 शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत. शेळीमेंढी मालकांचे यात मोठेच नुकसान झाले.
महाराष्ट्रात रायगड, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या ५ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. पाऊस व त्यानंतरचा गारवा जनावरांना सहन झाला नाही. त्यातच या कालावधीत मेंढ्यांची लोकर काढण्यात येते. त्यामुळे त्यांना थंडी व पावसाचा जास्त त्रास झाला. २९ तालुके व १९९ गावांना हा फटका बसला. यातील बहुसंख्य ठिकाणी शेळ्यामेंढ्यांसाठी तात्पुरता निवारा केलेला असतो. मात्र पावसात तो टिकला नाही. जोराचा पाऊस असल्याने बांधलेली शेडही काही ठिकाणी पडून गेली व जनावरे उघडी पडली. थेट अंगावर पडलेला पाऊस त्यांना सहन झाला नाही. त्यातच नंतर सुटलेली थंडी त्यांच्या जीवावर बेतली आहे.
पुणे जिल्ह्यात तब्बल 2 हजारखूनही अधिक जनावरे दगावली
पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना ऐन थंडीत गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस रात्री उशीरापर्यंत धो-धो कोसळत होता. पावसासोबतच प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने याचा फार मोठा फटका रानोमाळ फिरणाऱ्या मेंढपाळ व शेतक-यांना बसला. एकाच वेळी धुवाधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात तब्बल 2 हजार 133 शेळ्यामेंढ्या दगावल्या आहेत. यामध्ये 2 हजार 38 मेंढ्या, 86 शेळ्या, 6 गाय, एक म्हैस व 2 वासरे मृत्यू झाला.
मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यायला हवी
''तंबू किंवा कनाती पक्क्या बांधणे गरजेचे असते. जनावरांना निसर्गाने पुरेशी संरक्षण व्यवस्था शरीरातच दिली आहे, मात्र काही वेळा ती टिकू शकत नाही. त्यामुळे जे हे प्राणी पाळतात, त्यांनीच अशा वातावरणात त्यांची काळजी घ्यायला हवी. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर शेळ्यामेंढ्या पाळणाऱ्यांनी तर यासंदर्भात विशेष दक्षता घ्यायला हवी असे पशूसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले आहे.''