महिलांचे अनोखे भजन आंदोलन, दारू दुकानाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:18 AM2017-08-11T02:18:18+5:302017-08-11T02:18:18+5:30
येथील गराडे वस्तीनजीक नव्याने होत असलेल्या दारू दुकानाला विरोध करण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांनी अनोखे भजन आंदोलन करीत तीव्र विरोध व्यक्त केला आहे.
यवत : येथील गराडे वस्तीनजीक नव्याने होत असलेल्या दारू दुकानाला विरोध करण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांनी अनोखे भजन आंदोलन करीत तीव्र विरोध व्यक्त केला आहे.
गावातील पुणे-सोलापूर महामार्गालगत यापूर्वी सुरू असलेले वाईन शॉप सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बंद झाले आहे. दुकान आता नव्याने निर्माण झालेल्या नियमानुसार महामागार्पासून विहीत अंतरावर स्थलांतरीत करण्यासाठी संबंधित दुकान मालकाने गराडेवस्ती नजीकची जागा निवडल्याची माहिती परिसरातील महिलांना मिळण्यानंतर महिलांनी तीव्र विरोध केला आहे.
महिलांनी याबाबत पोलीस ठाण्यात मोर्चा नेत नव्याने होणारे दारू दुकान सुरू केले जाऊ नये, यासाठी दोनवेळा निवेदन दिले आहे. आमदार राहुल कुल यांना महिलांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी संबंधित दुकान होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अधीक्षक उत्पन्न शुल्क यांना पत्र देऊन संबंधित दुकानाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
गावातील सर्व महिलांचा विरोध तीव्र होत असतानादेखील संबंधित दुकान चालकाने दुकान सुरू करण्यासाठी तयारी सुरूच ठेवल्याने महिलांनी व ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. त्याच अनुषंगाने दुकान सुरू होत असलेल्या ठिकाणी भजन आंदोलन केले.
आंदोलनात २०० महिला सहभागी
यावेळी गावातील विठ्ठल समाज भजनी मंडळाने भजन आंदोलनात सहभागी घेतला. हभप सोनबा कुदळे, रघुनाथ महामुनी, बंडू बंड यांच्यासह सहकाºयांनी यावेळी भजन केले. यावेळी जवळपास २०० महिलांनी उपस्थिती दाखवत आंदोलनात सक्रीय सहभागी घेतला.
ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष
महिलांनी दारू दुकानाला विरोध करत स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ग्रामसभेत गावात आडवी बाटली करण्याचा ठराव घेण्याची मागणी केली आहे. या मागणीला ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला असून आता ग्रामसभेत नेमके काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.